वैभव नाईकांची एसीबीकडे तक्रार करणारा विनायक राऊतांचा कट्टर कार्यकर्ता - नितेश राणे
By सुधीर राणे | Published: October 17, 2022 04:37 PM2022-10-17T16:37:24+5:302022-10-17T16:37:57+5:30
Nitesh Rane : खासदार राऊत यांना वैभव नाईक का नकोत? त्यांना त्यांच्या मुलाला किंवा मुलीला निवडणुकीला उभे करायचे आहे का? त्यातले खरे- खोटे काय ते त्यांनाच विचारा, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.
कणकवली : आमदार वैभव नाईक यांच्याविरुद्ध एसीबीकडे ज्याने तक्रार केली तो कार्यकर्ता खासदार विनायक राऊत यांचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्याला वसईमध्ये खासदार विनायक राऊत यांनी घर घेऊन दिले होते. खासदार राऊत यांच्या जवळचीच व्यक्ती जर तक्रार करत असेल, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने खासदार राऊत यांच्या घरावर मोर्चा काढायला हवा होता. खासदार राऊत यांना वैभव नाईक का नकोत? त्यांना त्यांच्या मुलाला किंवा मुलीला निवडणुकीला उभे करायचे आहे का? त्यातले खरे- खोटे काय ते त्यांनाच विचारा, असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्यावतीने १८ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे एसीबी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने कणकवली येथे प्रसिद्धी माध्यमांजवळ नीतेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.ते म्हणाले, आमदार नाईक यांच्याविरुद्ध ज्याने तक्रार केली आहे, तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने आपण तक्रार केली असल्याचे ट्विटर द्वारे म्हटलेले आहे. तो विनायक राऊत यांचा चाहता आहे. वसई येथे त्याचे राहते घर राऊत यांनी दिले असे त्याचे म्हणणे आहे.
जर विनायक राऊत यांच्या जवळची व्यक्ती आमदारांविरुद्ध तक्रार करत असेल, तर मोर्चा एसीबीच्या कार्यालयावर का? तो विनायक राऊतांच्या घरावर काढायला हवा. हा त्यांच्या पक्षांतर्गतचा विषय आहे. मग ही टीका भाजपवर का? त्या तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्याला पुढे करून आमच्या 'अधीश' बंगल्याबाबतही तक्रार करण्यात आली होती. आता शिवसेनेअंतर्गत राऊत त्याचा वापर करीत आहेत. तक्रारदार हा राऊत यांचा समर्थक आहे, त्याचा पुरावाही आमच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपवर आरोप करण्यापेक्षा राऊत यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपवण्यासाठी ही सारी नाटके चालू आहेत. आमदार नाईक यांना भाजपात कोणीही बोलावलेले नाही. त्यांना कोणी आमंत्रण दिले आहे? त्याचा पुरावा द्यावा.
यावेळी नीतेश राणे यांनी तक्रारदाराच्या ट्विटर हँडलवरील शिवसेनेचे मशाल चिन्ह असलेले फोटो सादर केले अंतर्गत वादातून हे चालू असून त्यात भाजपची बदनामी का करताय? आमदार शहाजी बापू पाटील यांनीही या दोन राऊत यांनी आमची वाट लावली असे नुकतेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे खासदार राऊत यांचा आमदार नाईक यांना अडचणीत आणण्यामागे काय उद्देश आहे? हे त्यांनाच विचारा असेही नीतेश राणे म्हणाले.