विनोद कांबळी क्रिकेट अकादमी सुरू करणार, नितेश राणे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 08:20 PM2017-11-13T20:20:12+5:302017-11-13T23:04:50+5:30
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्रिकेट खेळणारे गुणवंत खेळाडू असून, त्यांना मुंबई, पुणे सारख्या शहरात असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्रिकेट खेळणारे गुणवंत खेळाडू असून, त्यांना मुंबई, पुणे सारख्या शहरात असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. 1 फेब्रुवारीपासून 'विनोद कांबळी क्रिकेट अकादमी' सुरू करण्यात येणार आहे. कणकवली तालुक्यातील कलमठ येथे सर्व सुविधांनी युक्त असे मैदान तयार करण्यात येणार असून, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचा भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी खेळाडूंना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.
जानवली येथील हॉटेल नीलम कंट्रीसाईड मध्ये सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी क्रिकेटपटू विनोद कांबळी, प्रशिक्षक ऋषिकेश भावे, खेळपट्टी तज्ज्ञ नदीम उपस्थित होते. आमदार नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गातील तरुणांना क्रिकेट आणि चित्रपटाचे वेड आहे. क्रिकेटीयर तसेच सिने अभिनेत्यांना हे तरुण देव मानतात. त्यांच्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करतात. काही जण त्यांच्यात असलेल्या जिद्द तसेच आत्मविश्वासाच्या जोरावर परिश्रम करून संबधित क्षेत्रात नावलौकिक कमावतात. मात्र, शहरात गेलेले बरेच जण परत ग्रामीण भागातील आपल्या गावाकडे परतत नाहीत.
परंतु विनोद कांबळी हा चांगले मन असलेला खेळाडू आहे. सिंधुदुर्गसारख्या ग्रामीण भागात येऊन तेथील गुणवंत क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्याचे त्याने ठरविले आहे. त्यासाठी त्याच्याच नावाने ही क्रिकेट अकादमी सुरू करण्यात येत आहे. विनोद कांबळी प्रत्येक महिन्यात पाच वेळा कलमठ येथील मैदाणात क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करणार आहे. त्याचे इतर क्रिकेटपटू मित्रही वेळोवेळी येथील खेळाडूंना प्रशिक्षण देणार आहेत.
40 खेळाडूंची बॅच असणार असून, मुले तसेच मुलींचा समावेश यामध्ये असेल. आंतरराष्ट्रीय खेळपट्टी तयार करणारे नदीम मुंबई येथे शिवाजी पार्क तसेच वानखेडे स्टेडियमसारख्या सुविधा येथे निर्माण करणार आहेत. 14 ते 16 वर्षाच्या तरुणांमधून 'टॅलेंट'असलेल्या खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील तरुण ज्यावेळी रणजी क्रिकेट स्पर्धेसारख्या स्पर्धेत खेलतील तो आमच्यासाठी समाधानाचा क्षण असेल असे आमदार राणे यावेळी म्हणाले.
विनोद कांबळी म्हणाला, रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा हे माझे गाव आहे. ग्रामीण भागातील मुलांना क्रिकेट सारख्या क्षेत्रात कमी संधी मिळते. कपिल देव सारखे नावाजलेले क्रिकेटपटू ग्रामीण भागातूनच पुढे आले आहेत. त्यामुळे येथील खेळाडूंना माझ्याकडील सर्व कौशल्य सहकाऱ्यांच्या मदतीने शिकविणार आहे. त्यामुळे येथील मुलांनी फक्त मैदानात उतरावे त्यांना जे शिकायचे आहे ते आम्ही शिकवू. पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यावे. कारण खेळामुळेच एक चांगला माणूस घडू शकतो. मी एखाद्या शहरात अकादमी सुरू करू शकलो असतो. मात्र मला कोकणचे प्रेम येथे खेचून घेऊन आले, असेही तो यावेळी म्हणाला. यावेळी नदीम म्हणाले, आमदार नितेश राणे यांचे विचार महान आहेत. त्यांनी येथील खेळाडूंना घडविण्याचा चांगला निर्णय घेतला असून, त्यांना आमचे सर्वोतोपरी सहकार्य राहील. येत्या तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय स्तरासारखे मैदान बनविण्यात येईल.
रमाकांत आचरेकर यांना भारतरत्नने गौरवावे !
आमचे गुरुजी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर यांनी जे जे आम्हाला शिकविले ते ते परत करायची वेळ आली आहे. त्यामुळे नवोदित खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मी घेतला आहे. रमाकांत आचरेकर यांनी आपल्या देशाला सचिन तेंडुलकर, सचिन आगरकर असे दहा ते बारा नामवंत खेळाडू दिले. त्यांचे हे कार्य उल्लेखनीय असून त्यांना भारतातील ' भारतरत्न ' हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविणे आवश्यक आहे, असे मत यावेळी विनोद कांबळी याने व्यक्त केले.
राजकारणात आलो नसतो तर खेळाडू झालो असतो!
माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे तसेच मला क्रिकेटची आवड आहे. निलेश व मी शिवाजी पार्क येथे क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे आम्ही सर्वजणच राजकारणात आलो नसतो तर खेळाडूच झालो असतो. तसेच इथे जी फटके बाजी करतो आहोत ती तिथे केली असती, असे आमदार नितेश राणे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. तसेच या क्रिकेट अकडमीच्या माध्यमातून तयार झालेल्या 20 ते 25 खेळाडूंचा सर्व खर्च करून त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळविणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.