केंद्र सरकारने आणलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा-विनोद तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 04:46 PM2020-10-03T16:46:34+5:302020-10-03T16:49:23+5:30
कोरोना संकटकाळात राज्यातील जनतेसाठी भाजपाच्यावतीने अनेक उपक्रम राबविले, सहकार्य केले. मात्र, राज्य सरकारने जनतेसाठी काहीच केले नाही, असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारवर केला.
कुडाळ : कोरोना संकटकाळात राज्यातील जनतेसाठी भाजपाच्यावतीने अनेक उपक्रम राबविले, सहकार्य केले. मात्र, राज्य सरकारने जनतेसाठी काहीच केले नाही, असा आरोप भाजपाचे राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारवर केला.
कुडाळ येथील सिंधु आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत संवाद अभियान व केंद्र सरकारने आणलेल्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी सदैव कार्यरत रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
आत्मनिर्भर भारत संवादयात्रा अभियानाचा समारोप कार्यक्रममहालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे पार पडला. यावेळी माजी मंत्री विनोद तावडे यांनी आत्मनिर्भर भारत याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, माजी आमदार अजित गोगटे, सिंधु आत्मनिर्भर अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष ओंकार तेली, संजू परब, राजन गिरप, महिला मोर्चा प्रमुख संध्या तेरसे, राजू राऊळ, अशोक सावंत, प्रभाकर सावंत, भाई सावंत, विनायक राणे, बंड्या सावंत, विजय केनवडेकर तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले, कोरोना संकट असताना राज्य सरकारने काहीच केले नाही. मात्र, केंद्र सरकारने जनतेला सर्वात मोठे पॅकेज देऊन जनतेला आधार देण्याचे काम केले आहे. केंद्राने काय योजना आणल्या या सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.
आत्मनिर्भर योजनेची सुरुवात या जिल्ह्यात अतिशय सुंदररित्या झाली. सर्वांनी आत्मनिर्भर होण्यासाठी ही योजना केंद्र सरकारने ठेवलेली आहे. त्याचा फायदा करून घ्या, असे ते म्हणाले.
यावेळी अतुल काळसेकर म्हणाले, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या योजना, उपक्रम, ध्येयधोरणे यामुळे लवकरच आपल्या देशाची अर्थव्यवस्था . जगात पहिल्या क्रमांकाची असणार आहे. या आत्मनिर्भर योजनेंतर्गत सर्व घटकांना सामावून घेतले असून या सर्वांचा विकास झपाट्याने होणार आहे.
सोशल डिस्टन्सिंग पाळून हा कार्यक्रम पार पडला. तसेच व्हर्च्युअल सभेद्वारे संपूर्ण राज्यभर या कार्यक्रमाचे आॅनलाईन प्रक्षेपण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन प्रभाकर सावंत यांनी तर प्रास्ताविक अतुल काळसेकर यांनी केले. आभार प्रदर्शन विजय केनवडेकर यांनी केले.
अभियानाच्या माध्यमातून कोट्यवधींचे अनुदान
आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. धान्याची सुविधा, उज्ज्वला गॅस, शेतकरी सन्मान निधी, जनधन व्यापारी, मच्छिमार, महिला बचतगट शेतकरी यांच्यासाठी दिलासा देणारी योजना आहे. संकटाचे संधीत रुपांतर करण्यासाठी आत्मनिर्भर पॅकेज तयार करण्यात आले. यातील या योजनेमुळे आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीचे औचित्य साधून अभिवादन करण्यात आले. तसेच विनोद तावडे यांची भाजपा राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा भाजपाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मत्स्य संपदा या पुस्तिकेचे प्रकाशन विनोद तावडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
थेट विक्रीसाठी कायदा केंद्राने संमत केला
आपल्या देशातील शेतकरी उद्योजक व्हावा, त्याला त्याच्या मालाची थेट विक्री करता यावी यासाठी कायदा केंद्र सरकारने संमत केला. मात्र, विरोधक हे उगाच विरोध करीत आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हा कायदा काय आहे याची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना द्यावी, असेही तावडे म्हणाले.