आचारसंहिता भंग - निवडणूक काळात जिल्हा बँक अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक
By अनंत खं.जाधव | Published: November 10, 2024 02:41 PM2024-11-10T14:41:52+5:302024-11-10T14:42:04+5:30
निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची बैठक लावण्यात आली.
सावंतवाडी - निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची बैठक लावण्यात आली. हा प्रकार आचारसंहिता भंग होण्यासारखा आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उद्धव सेनेच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्याकडे केली आहे.
याबाबतची तक्रार उद्धव सेनेचे प्रथमेश तेली यांच्याकडून करण्यात आली आहे. आचारसंहिता कालावधीत पूर्वपरवानगी शिवाय अशाप्रकारे कोणती बैठक घेण्यात येऊ शकत नाही, असे असताना सावंतवाडी येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत ही बैठक लावण्यात आली. त्यामुळे आचारसंहितेचा भंग होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले असून या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार सावंतवाडी येथील एका संकुलात जिल्हा बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. याबाबत कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून संबंधितावर आचारसंहितेचे गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.