सामर्थ्यसंपन्न समाजाच्या मागे वीर हनुमान उभा : परचुरे
By admin | Published: May 12, 2015 09:20 PM2015-05-12T21:20:47+5:302015-05-12T21:20:47+5:30
गुहागरमधील समारंभ : स्वरयात्री मैफलीने मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाची सांगता
गुहागर : ज्या समाजामध्ये सामर्थ्य आहे, त्यामागे हनुमान देवस्थानचा आशीर्वाद, वास्तव्य आपल्याला पाहावयास मिळेल, असे प्रतिपादन श्री व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरूण परचुरे यांनी केले.गुहागरातील श्रीदेव व्याडेश्वर मंदिरासमोरील महाद्वारामध्ये श्री हनुमंत, श्री गरूड तसेच प्राकारातील श्री अंबिकादेवीच्या प्राणप्रतिष्ठान सोहळ्याच्या सांगता समारंभावेळी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, विनय, विक्रम आणि विवेक यांचा संगम मारूतीमध्ये पाहावयास मिळतो. हनुमंत देवस्थान फंडचा हा पहिलाच सर्वात मोठा कार्यक्रम असून, यापूर्वी छोटे मोठे कार्यक्रम आम्ही करत आलो आहोत. सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडला आहे. श्री देव व्याडेवर देवस्थानला दीड लाखाचा धनादेश श्री हनुमंत देवस्थान फंडच्यावतीने देण्यात आला. यावेळी देणगीदार आशुतोष अभ्यंकर यांचा सपत्नीक, श्रीदेव व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरूण परचुरे, पत्नी स्नेहा परचुरे यांचा हनुमान देवस्थानचे अध्यक्ष धनंजय खातू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच महाद्वाराचे कन्स्ट्रक्शन करणारे नितीन बेंडल, प्राणप्रतिष्ठापना वैदीक विधी करणारे गोवा येथील वल्लभ फडके गुरूजी, व्याडेश्वर देवस्थानचे सर्व ट्रस्टी, गुहागरातील पत्रकार यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली बावधनकर यांनी केले.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची सांगता सांगली येथील ‘स्वरयात्रा’ मैफलीने झाली. भावगीत, भक्तीगीत व नाट्यगीतांच्या बहारदार कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने करून ‘जय शंकरा गंगाधरा’, ‘माझे माहरे पंढरी’, ‘नव वसन धारिणी, तारिणी’, ‘केव्हा तरी पहाटे, उलटूनी रात्र गेली’ आदी गीतांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. (प्रतिनिधी)
गुहागर येथील कार्यक्रमांना नागरिकांची मोठी उपस्थिती.
जय शंकरा गंगाधरा, केव्हा तरी पहाटे, उलटुनी रात्र गेली अशा गीतांनी रसिक मंत्रमुग्ध.
व्याडेश्वर मंदिर महाद्वार मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा रंगला.