सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विरेंद्र मोंडकर महाराष्ट्र क्रिकेट संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 03:26 PM2017-09-28T15:26:39+5:302017-09-28T15:26:46+5:30
शिक्षण विकास मंडळ देवगडच्या एन. एस. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी विरेंद्र संतोष मोंडकर याची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात गोलंदाज म्हणून निवड झाली आहे. १७ वर्षे वयोगटातील राज्य सेक्रेटरी संघात निवड झालेला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी आहे.
देवगड 28 : शिक्षण विकास मंडळ देवगडच्या एन. एस. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाचा अकरावी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी विरेंद्र संतोष मोंडकर याची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात गोलंदाज म्हणून निवड झाली आहे. १७ वर्षे वयोगटातील राज्य सेक्रेटरी संघात निवड झालेला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयाने आपल्या क्रिडाविषयक धोरणात आमूलाग्र बदल केले असून, या धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याचा विकास करणारे पोषक वातावरण, सोयीसुविधा व प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. परंतु हे क्रिडा धोरण कार्यान्वित करतानाच अभ्यास आणि खेळ यांचे योग्य संतुलन राखण्याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत असून तो सकारात्मक होत आहे.
विरेंद्र याला महाविद्यालयाच्या क्रीडा कोट्यातून प्रवेश देण्यात आला आहे. त्याने घेतलेली मेहनत व मिळविलेले यश या दोहोंसाठी संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य व शिक्षक यांच्यावतीने त्याला गौरविण्यात आले.
यावेळी त्याने महाविद्यालयाचे तसेच त्याला मार्गदर्शन करणारे सुधीर साटम, शैलेंद्र महाडिक, गणेश माळवदे व क्रिडा शिक्षक अमोल जमदाडे यांचे आभार मानले.