विशाल परब यांचे भाजपमधून निलंबन, महायुतीतील बंडखोरी भोवली
By अनंत खं.जाधव | Published: November 5, 2024 12:05 PM2024-11-05T12:05:32+5:302024-11-05T12:06:41+5:30
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिंदेसेनेचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज ...
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिंदेसेनेचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवणारे भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना भाजपातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून याबाबत माहिती देण्यात आली. तसेच पक्षाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले असून त्यांना प्रदेश व मोर्चाच्या उपाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले आहे.
परब यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. आपला अर्ज मागे घ्यावा असे पक्षाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले असतना मात्र त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सहा वर्षांसाठी निलंबित तसेच सदस्यत्व रद्द करण्यात आल्याने त्यांनी यापुढे पक्षाचे चिन्ह अथवा पक्षाचा वापर करू नये अथवा फोटो वापरल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल असे ही पत्रकात म्हटले आहे.
याबाबत परब यांना विचारले असता आपणास अशी नोटीस अद्याप पर्यंत आली नाही. तसेच पक्षाचे कामकाज सर्व तळागाळात जावे यासाठी प्रयत्न केले मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे. तसेच मी इकडे तिकडे उड्या मारल्या नाहीत असे सांगून परब यांनी निलंबन कारवाई बोलण्यावर टाळले.