नापणे येथील प्रस्तावित ऊस संशोधन केंद्राच्या नियोजित जागेची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:31 PM2019-08-23T12:31:08+5:302019-08-23T12:34:58+5:30
वैभववाडी : जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी बुधवारी सकाळी धावत्या भेटीत नापणे येथील प्रस्तावित ऊस ...
वैभववाडी : जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी बुधवारी सकाळी धावत्या भेटीत नापणे येथील प्रस्तावित ऊस संशोधन केंद्राच्या नियोजित जागेची पाहणी केली. ही शासकीय जागा ऊस संशोधन केंद्राला देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून कोकण कृषी विद्यापीठाने रक्कम शासनाकडे भरणा केल्यानंतर या जागेचे विद्यापीठाकडे हस्तांतरण होणार आहे.
गगनबावडा तालुक्यातील वेसरफ येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्यामुळे वैभववाडीसह कणकवली राजापूर तालुक्यात ऊसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत चालले आहे. त्यामुळे कोकणातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बियाणे, तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध होऊन अर्थिक प्रगती होण्यासाठी ऊस संशोधन केंद्राची आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन माजी आमदार प्रमोद जठार यांनी गेल्या दहा वर्षांपासून ऊस संशोधन केंद्रासाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे.
त्यामुळे राज्य सरकारने नापणेतील सुमारे १८ एकर शासकीय जागा सरकारी दराने ऊस संशोधन केंद्राला देण्यास मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर आलेले कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी नियोजित जागेला धावती भेट देऊन पाहणी केली.
यावेळी कोकण पर्यटन विकास समितीचे उपाध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, तहसीलदार रामदास झळके, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी एस. डी. बागल, वेंगुर्ले कृषी संशोधन केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ. बी. एन. सावंत, फोंडाघाट कृषी संशोधन केंद्राचे डॉ. विजय शेटे, तालुका कृषी अधिकारी अमोल आगवान, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे, बंड्या मांजरेकर, बबलू सावंत, किशोर जैतापकर, माजी सरपंच प्रकाश जैतापकर, उदय जैतापकर, महेश गोखले अधिकारी उपस्थित होते.