आंगणेवाडीत भाविकांना दहा रांगांतून दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:13 AM2019-02-25T00:13:21+5:302019-02-25T00:13:25+5:30
मालवण : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी पहाटे ...
मालवण : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी पहाटे यात्रेला सुरुवात होणार आहे. भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडीनगरी सजली असून भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला
केलेली विद्युत रोषणाई आकर्षण ठरत होती. आंगणे कुटुंबीयांनी वार्षिकोत्सव साजरा करण्यासाठी चोख
नियोजन केले आहे. भाविकांना दहा रांगांतून देवीचे सुलभ दर्शन घेता येणार आहे.
दरम्यान, सुमारे सात ते आठ लाख भाविक यात्रोत्सवाला उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात्रेला होणारी उच्चांकी गर्दी लक्षात घेऊन आंगणेवाडी ग्रामस्थ, महसूल, वीज वितरण, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. विविध प्रकारची दुकाने, स्वागत कमानी तसेच विद्युत रोषणाईने आंगणेवाडी सजली आहे. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांची शिबिरे, कबड्डी स्पर्धा, शुटींग बॉल स्पर्धा यांसह अन्य करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत.
भराडी देवीच्या यात्रोत्सवास सोमवारी पहाटे सुरुवात होणार आहे. यात्रोत्सवात भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून उड्डाणपुलासह व्हीआयपी रांगा, तसेच आठ रांगा तर दोन जादा रांगा अशा दहा रांगांतून दर्शन
होणार आहे. तुलाभार सुलभ होण्यासाठी स्वतंत्र रांग असल्याने भाविकांना नवस फेडणे सुलभ होणार आहे.
पहाटे ओटी भरण्यास सुरुवात होणार आहे. प्रसाद (ताटे लावणे) कार्यक्रमावेळी दर्शन रांगा बंद केल्या जाणार आहेत. त्यानंतर पुन्हा दर्शन व ओटी भरण्याच्या रांगा सुरू होतील. मंगळवारीही ओटी भरण्यासाठी व दर्शनासाठी रांगा सुरू राहतील, असे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, नरेश आंगणे यांनी सांगितले.
आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रेसाठी मालवण आगारातून ४६ एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. २५ रोजी पहाटेपासून मालवण एसटी आगारातून आंगणेवाडी येथे जाण्यासाठी बसफेºया रवाना होणार आहेत. मालवण बसस्थानकातून १८ एसटी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच तालुक्याच्या अन्य भागातून २८ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. टोपीवाला हायस्कूल येथून तीन एसटी गाड्या, देवबाग तारकर्ली येथून तीन एसटी गाड्या, सर्जेकोट येथून दोन एसटी गाड्या, आनंदव्हाळ, डांगमोडे येथून एका एसटीचे नियोजन करण्यात आले आहे.
चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी मालवण-बोरिवली एसटी गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.