भविष्यात प्राथमिक शाळांमध्येच मुलांना व्यावसायिक शिक्षणाचे धडे - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 04:59 PM2023-09-11T16:59:29+5:302023-09-11T17:13:08+5:30
आजी-आजोबा दिन साजरा
अनंत जाधव
सावंतवाडी : येत्या काळात शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यामुळे मुलांना लहानपणातच श्रमाचे महत्व कळणार आहे. तसेच नोकरी नाही, ही समस्या निर्माण होणार नाही. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
दरम्यान आजपासून पुढच्या काळात राज्यभर आजी-आजोबा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपली नातवंड शाळेत जाऊन नेमक काय शिकतात, हे त्यांना पाहण्यासोबत नातवंडांचे कौतुक करण्याची संधी आजी-आजोबांना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. येथील कळसुलकर इंग्लिश स्कुलच्या सभागृहात आयोजित आजी-आजोबा दिनाच्या निमित्ताने मंत्री केसरकर बोलत होते.
यावेळी शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष शैलेश पै, सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, पदाधिकारी गौरांग चिटणीस, राजश्री टिपणीस, अण्णा मापसेकर, श्रद्धा नाईक, मुकुंद वझे, रवींद्र स्वार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोटसकर, मुख्याध्यापक प्रदीप सावंत, आनंद शिशुवाटिकेच्या व्यवस्थापिका नम्रता नेवगी, जेष्ठ नागरिक संघाचे अण्णा देसाई, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, नीता कविटकर, पालक वर्ग व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
दरम्यान सदाशिव पेडणेकर व धोंडी वरक यांचा सन्मान करण्यात आला. या निमित्ताने मंत्री केसरकर म्हणाले, प्रथमच शासनाकडून आजी आजोबा दिन साजरा करण्यात येत असून यातून आजी आजोबा ना मुलाच्या पाठीवर थाप मारायला मिळते. आजी आजोबा मुलाच्या शाळेत येऊ शकतात या उपक्रमाची सुरुवात सावंतवाडीतून होत आहे याचा मला आनंद असल्याचे म्हणाले.