वाफोलीत मेगा अल्ट्रा प्रकल्प, पंधराशे युवकांना थेट रोजगार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 11:58 PM2018-07-16T23:58:46+5:302018-07-16T23:58:59+5:30
स्ट्रीमकास्ट कंपनीचा डेटा सेंटर असलेला मेगा अल्ट्रा प्रकल्प बांदा-वाफोली येथे येत असून, हा प्रकल्प बावीसशे कोटी रुपयांचा असून, जिल्ह्यातील पहिला रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे.
अनंत जाधव
सावंतवाडी : अनेक प्रकल्पांना विरोध झाल्यानंतर सिंधुदुर्गात रोजगार येण्याच्या दृष्टीने स्ट्रीमकास्ट कंपनीचा डेटा सेंटर असलेला मेगा अल्ट्रा प्रकल्प बांदा-वाफोली येथे येत असून, हा प्रकल्प बावीसशे कोटी रुपयांचा असून, जिल्ह्यातील पहिला रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन बुधवारी १८ जुलैला होणार आहे. डेटा सेंटरच्या माध्यमातून कुशल-अकुशल असे मिळून पंधराशे लोकांना यातून रोजगार उपल्बध होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार नाही. येथील मुलांनी नोकरी-व्यवसायासाठी कुठे जायचे असे अनेक प्रश्न सतत निर्माण होत होते. नाणार प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर रोजगाराच्याबाबत राजकीय व्यक्तींनी ठोस भूमिका घ्यावी, अशीच सर्व क्षेत्रातून मागणी होत होती. त्यातूनच पहिल्या रोजगाराचे साधन बांदा-वाफोली येथे उभे राहत आहे.
आयटी विभागाशी संबंधित असा भारतातील पहिला डेटा सेंटर हा स्ट्रीमकास्टच्या माध्यमातून उभा राहत आहे. यातून तब्बल पंधराशे युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. हा बावीसशे कोटी खर्च करून मेगा अल्ट्रा प्रकल्प उभा राहत आहे. सिंधुदुर्गमध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक छोटी-छोटी डेटा सेंटरही उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन बुधवारी होत आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या कंपनीला प्राप्त झाल्या आहेत.
आयटीच्या माध्यातून मोठमोठ्या शहरांमध्ये रोजगार उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा यात मागे होता. ओरोस येथे आयटी पार्कसाठी जागाही संपादीत केली आहे. मात्र, खासगी कंपनी आपले स्वत:चे आयटीशी संबंधित डेटा सेंटर बांदा-वाफोली येथे सुरू करीत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असून, यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, बांदा सरपंच मंदार कल्याणकर आदी उपस्थित राहणार आहेत.
मेगा अल्ट्रा प्रकल्प रोजगाराचे नवे दालन
बांदा-वाफोलीमध्ये हा मेगा अल्ट्रा प्रकल्प उभा राहत आहे. या माध्यमातून कुशल-अकुशल अशा पंधराशे जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. हा पहिला प्रकल्प आहे. त्यामुळे ही कंपनी जास्तीत जास्त तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. याचे डेटा सेंटर इतर तालुक्यात येणार असून, त्यातूनही रोजगार उपलब्ध होईल, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.