सिंधुदुर्गनगरीत मतदार नोंदणी सुरू, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:32 PM2018-05-18T14:32:05+5:302018-05-18T14:32:05+5:30
पुढील वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील निवडणूक यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर मतदारांची नावनोंदणी सुरू झाली असून मतदार यादी बिनचूक व अद्ययावत करण्यासाठी काम हाती घेतले जाणार आहे.
सिंधुदुर्गनगरी : पुढील वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील निवडणूक यंत्रणा जोरदार कामाला लागली आहे. १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर मतदारांची नावनोंदणी सुरू झाली असून मतदार यादी बिनचूक व अद्ययावत करण्यासाठी काम हाती घेतले जाणार आहे.
गेल्या दोन वर्षांत तब्बल २२ हजार मृत मतदारांची नावे वगळण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली. सुलभ निवडणुका ही २०१९ च्या निवडणुकीची टॅगलाईन असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण खाडे, निवडणूक नायब तहसीलदार दीप्ती धालवलकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचे पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १५ मे ते ४ जानेवारी २०१९ या कालावधीत ५ टप्प्यात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत १ सप्टेंबरला जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यात नवीन मतदारनोंदणी वाढविण्यासह अचूक मतदार यादी तयार करण्याचा उद्देश आहे.
या पुनरिक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांचे फोटो घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सध्या ९९ टक्के मतदार यादी ही छायाचित्र असलेले आहेत. तर ८७०० मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाहीत. त्यासह कृष्णधवल फोटो असलेल्या मतदारांचे रंगीत फोटो घेण्यात येतील. मतदार यादीतील चुका दुरुस्त करणे, मृत, दुबार स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, १८-१९ वर्षे वयोगटातील मतदारांच्या नोंदणीसाठी महाविद्यालयात विशेष मोहीम घेण्यात येणार आहे.
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे १५ मे ते २० जून या दरम्यान मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन बीएलओ रजिस्टर अद्ययावत व सखोलपणे पूर्ण करण्याचे काम पाहतील. या भेटीत जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांची मतदार नोंदणी, मृत, दुबार स्थलांतरित यांच्या चुका दुरुस्त करणे, नोंदवहीत त्याची नोंद घेणे असे कामकाज देण्यात आले आहे.
जिल्ह्यात ९१३ मतदान केंद्रे (भाग) असून यात एकाच कुटुंबात असलेले मतदार एकाच यादीत आणले जाणार आहेत. ९१३ मतदान केंद्रांपैकी ९११ मतदान केंद्रांवर रॅमची सुविधा उपलब्ध आहेत तर २ ठिकाणी ही सुविधा नाही. परंतु आगामी निवडणुकीपूर्वी ही संबंधित सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील बीएलओ यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मंगळवार १५ पासून सर्व बीएलओ यांनी मतदार नोंदणीचे काम सुरू करावे. जे बीएलओ या आदेशाचे पालन करणार नाहीत, कामात हलगर्जीपणा व दिरंगाई करतील अशांना दोन वर्षांचा कारावास होऊ शकतो, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण खाडे यांनी दिली
राजकीयांनी बुथ स्तरावर असिस्टंट नेमावेत
निवडणूक विभागामार्फत राबविण्यात येणाºया मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणी करणे, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे आदी प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे या प्रकियेबाबत वेळीच आक्षेप घेता यावेत किंवा सूचना मांडता यावी यासाठी राजकीय व्यक्तींनी बुथ स्तरावर असिस्टंट नेमावेत असे आवाहन निवडणूक अधिकारी प्रवीण खाडे यांनी केले आहे.
असा असणार पुनरिक्षण कार्यक्रम
१५ मे ते २० जून २०१८ बीएलओ यांची घरोघरी भेटीची मोहीम, २१ जून ते ३१ जुलै मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, १ सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादीची प्रसिद्धी, १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर रोजी दावे व हरकती स्वीकारणे, ४ जानेवारी २०१९ अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे.