आघाडीच्या उमेदवारांना मतदार निश्चित निवडून देतील

By admin | Published: March 29, 2016 10:41 PM2016-03-29T22:41:13+5:302016-03-29T22:41:13+5:30

अमित सामंत यांचा विश्वास : कुडाळ नगरपंचायतीत चांगल्या प्रशासनासाठी राष्ट्रवादीची कमी जागा लढविण्याची भूमिका

The voters will choose the candidates for the top candidates | आघाडीच्या उमेदवारांना मतदार निश्चित निवडून देतील

आघाडीच्या उमेदवारांना मतदार निश्चित निवडून देतील

Next


कुडाळ तसे पाहिल्यास जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण. वैभववाडी आणि दोडामार्ग पाठोपाठ आता कुडाळचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. येत्या १७ एप्रिलला नगरपंचायतची पहिली निवडणूक होत आहे. वैभववाडी आणि दोडामार्ग या तालुक्याच्या ठिकाणापेक्षा कुडाळ शहर फारच मोठे आहे. महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या कुडाळ शहरात नगरपंचायत निवडणूक होत आहे. सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर ‘कुडाळ गावाकडून नगराकडे’ ही मालिका ‘लोकमत’ ने सुरू केली आहे. आता या मालिकेअंतर्गत निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या प्रमुख पाच पक्षांची भूमिका आणि ते मतदारांपर्यंत कोणते मुद्दे घेऊन जाणार आहेत. याचा आढावा...आजपासून सलग पाच दिवस....


रजनीकांत कदम ल्ल कुडाळ
२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारवरील लोकांचा आता विश्वास उडालेला असून कुडाळ नगरपंचायतीला एक चांगले प्रशासन मिळावे यासाठीच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कमी जागा लढविण्याची भूमिका घेवून, काँग्रेस पक्षाला संपूर्णत: मदत करण्याची भूमिका घेतली आहे. या आमच्या आघाडीच्या उमेदवारांना येथील मतदार निश्चितच निवडून देतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य अमित सामंत यांनी व्यक्त केला.
पक्षाच्यावतीने कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीबाबत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडताना सामंत म्हणाले की, कुडाळ शहर नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक होत आहे. १७ एप्रिल रोजी होणाऱ्या कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी झालेली आहे.
२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांनी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांवर विश्वास दाखवून त्यांचे उमेदवार विजयी केले होते. परंतु दोन वर्षातच मतदारांचा भ्रमनिरास झाल्यामुळे आता शिवसेना व भाजपावर मतदारांचा विश्वास उरलेला नाही. व गेल्या वेळच्या अनेक निवडणुकांच्या निकालानुसार हे स्पष्ट झालेले आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे समविचारी पक्ष निवडणुकीत एकमेकांच्या समोर उभे राहतात व त्याचा फायदा या दोन्ही जातीवादी पक्षांना होतो. आणि म्हणूनच मतांचे विभाजन होवू नये. तसेच कुडाळ नगरपंचायतीला एक चांगले प्रशासन मिळावे. यासाठीच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कमी जागा लढविण्याची भूमिका घेवून, काँग्रेस पक्षाला संपूर्णत: मदत करण्याची भूमिका घेतली आहे.
कुडाळ शहराला सध्या वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रश्न भेडसावत आहेत. यापुढे या शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने विचार करणे गरजेचे झाले आहे. शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्था आजपर्यंत झालेली नाही. त्यामुळे मोठे गृहप्रकल्प उभे राहूनही त्यांचे सांडपाणी हे आजही रस्त्यावरच सोडले जाते व त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची समस्या भविष्यात आहे.
कुडाळ शहराच्या जवळ मोठी भंगसाळ नदी असूनही नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन न झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कधीही दोन्ही काँग्रेस पक्षांनी एकत्रित येत निवडणूक लढविली नव्हती. परंतु या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतदारांच्या समोर संपूर्णत: नवीन, तरुण आणि निष्कलंक चेहरे ठेवून एकत्रित निवडणूक लढवून १७ च्या १७ जागांवरही उमेदवार विजयी करण्याचे ध्येय ठेवलेले आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते नारायण राणे व आमदार नीतेश राणे व माजी खासदार नीलेश राणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्र पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना निवडून देऊन मतदार आमच्यावर विश्वास दाखवतील याची आम्हाला खात्री आहे असे मत अमित सामंत यांनी व्यक्त केले.


मूलभूत समस्या सोडविणार
लोकसंख्या वाढत असल्यामुळे कचऱ्याचा प्रश्न शहरापुढे उभा राहिला असून नजीकच्या काळात तो गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे. आजही कुडाळमध्ये क्रीडांगण, चांगली उद्याने नसल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. हे सर्व मुलभूत प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आतापर्यंत काहीही प्रयत्न न झाल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँंग्रेसने एकत्र येत आघाडीने निवडणूक लढविण्याची भूमिका घेतलेली आहे.
- अमित सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य

Web Title: The voters will choose the candidates for the top candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.