कुडाळमध्ये मतदार भाजपचीच सत्ता आणतील

By admin | Published: March 30, 2016 10:36 PM2016-03-30T22:36:47+5:302016-03-31T00:03:17+5:30

काका कुडाळकर यांचा विश्वास : काँग्रेस आणि शिवसेनेकडून विकासाकडे दुर्लक्ष, मुख्यमंत्र्यांकडून नागरी सुविधा मिळवून देणार--कुडाळ गावाकडून नगराकडे

Voters will get the BJP's power in Kudal | कुडाळमध्ये मतदार भाजपचीच सत्ता आणतील

कुडाळमध्ये मतदार भाजपचीच सत्ता आणतील

Next


रजनीकांत कदम -- कुडाळ
कुडाळ शहराच्या गेल्या ३५ वर्षाच्या काळात सत्तेत असलेल्या काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी कुडाळच्या सर्वांगिण विकासाकडे फारसे लक्ष दिले नसून नव्याने निर्माण झालेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत कुडाळचा विकास करण्यासाठी येथील मतदार भाजपच्याच पाठीशी राहून भाजपचीच सत्ता आणतील, असा विश्वास भाजपचे जिल्हा प्रवक्ते काका कुडाळकर यांनी बोलताना व्यक्त केला.
कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीबाबत आपल्या भारतीय जनता पक्षाची भूमिका मांडताना काका कुडाळकर म्हणाले की, सन १९८१ साली जिल्हा केंद्र झाल्यापासून कुडाळ शहर सातत्याने विकसित व वाढत चाललेले आहे. परंतु ३५ वर्षे येथील ग्रामपंचायतीवर सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस व शिवसेना यांच्या काळात कुडाळचा विकास हवा तसा झाला नाही. आज कुडाळ शहरात नगरपंचायत आली असून या कुडाळ शहराचा विकास करण्याची संधी भाजपला मिळाली असून भाजपच्यावतीने कुडाळ शहरासाठी १०० टक्के नागरी सुविधा देण्यात येणार आहेत.
गेली कित्येक वर्ष येथील जनता वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सुविधा मिळाव्यात म्हणून कुडाळ नगरपंचायत होण्याकडे आशेने पाहत होती. ही त्यांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली. याचाच अर्थ मुख्यमंत्री महोदयांनी कुडाळ शहराला नागरी सुविधा देण्याचेही मान्य केले आहे. त्यामुळे आगामी काळात कुडाळ शहराच्या विकासाबाबत भाजपच सातत्याने अग्रेसर राहणार आहे, असे कुडाळकर म्हणाले.
ही नगरपंचायत होण्यासाठी १५ वर्षे लागली. नळपाणी योजना अजूनही रखडलेली आहे, कचऱ्याच्या समस्यांसाठी लोकांनाही आंदोलन करावे लागते, तर रस्त्यांच्या दर्जाबाबत येथील जनता फारच नाराज आहे. तर सांडपाणी व्यवस्थेच्या बोजवाऱ्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होत आहे. या सगळ्या समस्यांवर आज विरोधक तोडगा काढू शकत नाहीत. कारण यासाठी आवश्यक असणारे सत्तेचे बल विरोधकांकडे नाही. कुडाळ शहर एक विकसित नगरी व्हावी याकरिता भाजप प्रयत्न करीतच राहणार आहे.
नगरविकास खाते हे मुख्यमंत्री महोदयांकडे आहे. त्यामुळे निवडणूक पूर्व काळातच भाजपच्या प्रदेश सचिव राजन तेली, तसेच प्रमोद जठार यांनी या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री महोदयांना साकडे घातले आहे. त्यांच्या अपेक्षित सहकार्यामुळे निश्चित प्रश्न सुटतील. भाजपचे नगरसेवक विजयी करणे ही काळाची गरज आहे. कारण आजचे ध्येय शहरवासीयांसाठी २४ तास पाणी पुरवठा झाला पाहिजे, हे आहे. आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी भुयारी गटार योजना प्रस्तावित केलेली आहे.
पोलिस वसाहतीच्या इमारत उभारणीसाठी मंजुरी मिळालेली आहे. भंगसाळ नदीचा काठ पर्यटनदृषृट्या विकसित होण्यासाठी नदी संवर्धन अंतर्गत योजनेतून निधी मिळणार, सुरेश प्रभूंच्या कृपेने रेल्वेजवळ भव्य उद्यान उभे राहणार आहे. रखडलेल्या क्रीडांगणाचा प्रश्न मार्गी लागला असून पुढील कामासाठी क्रीडामंत्री विनोद तावडेंनी अपेक्षित निधी दिला आहे.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी, डम्पिंग ग्राऊंडबरोबर प्रक्रिया युनिट उभारण्याचा मानस आहे. लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा भूमिगत व्हाव्यात यासाठी व शहरातील स्ट्रीटलाईटसाठी, रस्ते, छोटी उद्याने, मच्छिमार्केट यासाठी केंद्र सरकार कडून वित्त विभागामार्फत निधी खेचून आणणार आहोत. आज आमच्याच सरकारमुळे राष्ट्रीय महामार्गासाठी ८ हजार कोटीचा निधी मिळणार आहे. असा विश्वास कुडाळकर यांनी व्यक्त केला आहे.

नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न
आमचे उमेदवार अनुभवी सुशिक्षित व युवा उमेदवारांचा समन्वय साधलेले आहेत. निवडलेल्या उमेदवाराबाबत लोक आक्षेप घेवू शकतील अशा प्रकारची कोणतीही गोष्ट आमच्या उमेदवाराकडे नाही. त्यामुळे कुडाळ शहर सर्व नागरी सुविधायुक्त नगरी उभी करायची आहे. याकरीता कुडाळवासीय निश्चित भाजपच्यामागे राहतील.
- काका कुडाळकर, भाजप, जिल्हा प्रवक्ते

Web Title: Voters will get the BJP's power in Kudal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.