मतदार ‘अच्छे दिन’च्या नावाखाली फसणार नाहीत
By admin | Published: April 1, 2016 01:44 AM2016-04-01T01:44:12+5:302016-04-01T01:45:56+5:30
सुनील भोगटेंचा दावा : कुडाळ नगरपंचायतीवर काँग्रेस आघाडीची निर्विवाद सत्ता येईल
रजनीकांत कदम-- कुडाळ ‘अच्छे दिनाच्या’ नावाखाली स्थापन झालेल्या युती सरकारने अच्छे दिन आणले नसून त्यांना आता मतदार फसणार नाही. त्यामुळे कुडाळचे मतदार कुडाळच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या आघाडी सोबत राहून कुडाळ नगरपंचायतीवर आघाडीचीच सत्ता आणतील, असा विश्वास काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष सुनील राधाकृष्ण भोगटे यांनी व्यक्त केला आहे.
कुडाळवासीयांचे नगरपंचायतीचे कित्येक वर्षांचे स्वप्न आता प्रत्यक्षात पूर्णत्वास येत आहे. कुडाळ ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत झाले आणि सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली नगराध्यक्ष कोण आणि कोणत्या पक्षाचा आणि यातच मतदानाची तारीख १७ एप्रिल २०१६ जाहीर झाली. इच्छुक उमेदवारांची प्रत्येक पक्षाकडे उमेदवारी मिळविण्यासाठी मिळणाऱ्या मताची गोळा बेरीज सुरु केली.
परंतु राष्ट्रीय काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या पालकमंत्री पदाच्या काळात सिंधुदुर्गबरोबरच कुडाळचा झालेला विकास तसेच माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळच्या विकासाची वाटचाल निश्चितच नगरपंचायतच्या विजयाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे आणि म्हणून निश्चितच कुडाळ नगरपंचायतीवर राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता निश्चित येईल व नगराध्यक्ष हा काँग्रेसचा असेल, असे सुनील भोगटे म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले की, आज देशामध्ये अच्छे दिनाच्या नावाखाली सरकार स्थापन झाले. परंतु अच्छे दिन न आल्यामुळे या सरकारवरील विश्वास उडाला. म्हणून अनेक राज्यातील निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना अपयश पत्करावे लागले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्यावर विश्वास टाकला परंतु विकासाच्या तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीचे नुकसान, महागाई, रोजगार या सर्व स्तरावर त्यांना अपयश आले. हे लोकांनी ओळखले आहे.
त्यामुळे यापुढे प्रत्येक व्यक्तीही काँग्रेसच्या बाजूनेच मतदान करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आज कुडाळ शहराच्या ज्या प्रामुख्याने गरजा आहेत त्या गरजा माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे व आमदार नीतेश राणे यांच्या व आघाडीच्या माध्यमातून आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत. कुडाळ शहराचा विकास करताना प्रामुख्याने येथील सर्व रस्ते डांबरीकरण करणे, सर्व रस्त्यांवर वीज (स्ट्रीट लाईट), वाहतुकीची कोंडी पाहता रस्ता रुंदीकरण करून सुशोभिकरण करणे, खास मुलांसाठी चांगल्या प्रकारचे गार्डन उपलब्ध करणे, नाना- नानी पार्क (ज्येष्ठ नागरिकांसाठी), भुयारी गटारांसाठी प्रयत्न करणार, पार्किंगची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उत्तम अशी योजना राबिवणे अशा गोष्टी प्रामुख्याने हाती घेणार आहोत, असेही भोगटे म्हणाले. त्यामुळे मतदार काँग्रेस आघाडीच्या मागे उभे राहतील, असा आशावाद भोगटे यांनी व्यक्त केला आहे
राणेंवर जबाबदारी सोपवतील
विविध विकास कामे व मुलभूत सोयी सुविधा पुरविण्याचा मनोदय ठेवून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. मला विश्वास आहे की सर्व मतदार हे मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर विकासाची जबाबदारी सोपवून त्यांच्या सर्व सेवकांना कुडाळची सेवा करण्याची संधी देतील, यात तिळमात्र शंका नाही.
- सुनील भोगटे, काँग्रेस,जिल्हा उपाध्यक्ष