सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५१ हजार व्यक्ती क्वारंटाईन, तब्बल २९० अहवालांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 02:58 PM2020-05-31T14:58:28+5:302020-05-31T15:51:01+5:30
जिल्ह्यात एकूण ४८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी ७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला असून ३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सिंधुदुर्गनगरी : शनिवारी कोरोनाचा एकही तपासणी अहवाल आला नाही. कोल्हापूर येथे तपासणीसाठी पाठविलेल्या २९० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. जिल्ह्यात ५१ हजार ३१९ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात सध्या १२ कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले असून त्याठिकाणी पोलीस दिवस-रात्र तैनात आहेत.
जिल्ह्यात एकूण ४८ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी ७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला असून ३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे शुक्रवार २९ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकूण १८ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये वैभववाडी तालुक्यातील २, कणकवली तालुक्यातील १२, सावंतवाडी तालुक्यातील ३ आणि मालवण तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे.
शुक्रवारी प्राप्त झालेल्या १८ पॉझिटिव्ह अहवालांपैकी ९ अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. हे पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण कणकवली तालुक्यातील आहेत. त्यामध्ये वारगाव येथील ५, बिडवाडी येथील २, कासार्डे धुमाळवाडी १, सडुरे तांबळघाटी १ यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यातील शिवडाव, डामरे, वैभववाडी तालुक्यातील मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे व मेहबूबनगर, ब्राह्मणदेववाडी, आणि उंबर्डे, सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे, माडखोल, कुडाळ तालुक्यातील पणदूर - मयेकरवाडी, मालवण तालुक्यातील हिवाळे असे कंटेन्मेंट झोन आहेत.
जिल्ह्यात एकूण २६ हजार ३७८ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्यापैकी ३८२ व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर २४ हजार ८५१ व्यक्तींना गावपातळीवरील संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रामध्ये १ हजार ४५ व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण १ हजार ७१० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी १ हजार ४२० तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ४८ अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित १ हजार ३७२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून २९० नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
शनिवारी दिवसभरात किंंवा सायंकाळी उशिरापर्यंत एकही अहवाल प्राप्त झाला नव्हता. शुक्रवारी तब्बल ४० अहवाल आले होते. त्यापैकी २४ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे आता पुढील अहवालांची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
२ मे पासून ५५ हजार व्यक्ती दाखल
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या १३५ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ८१ रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, ३० रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये, कोविड केअर सेंटरमध्ये २४ रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत शनिवारी ६ हजार ६४७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मे २०२० पासून शनिवारअखेर एकूण ५५ हजार २१ व्यक्ती दाखल झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.