वायंगणीतील कासव जत्रेची करावी लागणार प्रतीक्षा
By Admin | Published: November 26, 2015 10:49 PM2015-11-26T22:49:39+5:302015-11-26T23:55:35+5:30
कासव प्रजननास सुरूवात नाही : वातावरणात सतत होत असलेल्या बदलांचा परिणाम
प्रथमेश गुरव- वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्र किनारी दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यात आॅलिव्ह रिडले या दुर्मीळ जातीची कासवे किनाऱ्यावर येऊन अंडी देतात. मात्र, नोव्हेंबर महिना संपत आला तरी अद्याप आॅलिव्ह रिडले या कासवांनी वायंगणी समुद्री किनारी अंडी देण्यास हजेरी लावलेली नाहीे. वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलांमुळे अद्यापर्यंत कासवांनी प्रजननास सुरुवात केली नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी होणाऱ्या कासव जत्रेसाठी पर्यटकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतात ओरिसाच्या समुद्रकिनारी आॅलिव्ह रिडले कासव लाखोंच्या संख्येने अंडी घालण्यासाठी येतात. हा किनारा कासवांसाठी सुरक्षित झाला आहे. अशाचप्रकारचे प्रयत्न सिंधुदुर्गात वायंगणी समद्र्रकिनाऱ्यावर सुहास तोरसकर आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. गेल्या काही वर्षात आॅलिव्ह रिडले जातीची कासवे दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात अंडी घालण्यासाठी वायंगणी-वेंगुर्ले, तांबळडेग-देवगड या किनाऱ्यांवर येत आहेत. वन विभागाच्या सहकार्याने सुहास तोरसकर आणि त्यांचे सहकारी कासवांच्या अंड्यांची ४0 ते ६0 दिवस काळजी घेतात. या प्रयत्नांमुळे नैसर्गिक जनन दर जो जेमतेम ४0 ते ५0 टक्के होता तो ७५ टक्क्यांवर जाऊन पोहचला आहे. दरवर्षी नोव्हेंबरपासून मार्च महिन्यांपर्यंत आॅलिव्ह रिडले जातीची कासवे वायंगणी किनाऱ्यावर अंडी घालतात. या अंड्यापासून बनविलेल्या पदार्थांना पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठी मागणी असते. त्यामुळे अंडी चोरीला जाऊ नये तसेच कुत्रे किंवा अन्य प्राण्यांपासून त्यांचे भक्षण होऊ नये म्हणून वायंगणी येथील कासवमित्र सुहास तोरसकर व त्यांचे सहकारी या अंड्यांची विशेष काळजी घेतात. अंडी ज्या ठिकाणी घातली आहे तेथे जाळे बसवून ५५ ते ६0 दिवसांनी पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली समुद्र्रात सोडले जाते. कासवाच्या आॅलिव्ह रिडले, हॉक्सबिल, ग्रीन (हरित कासव), लेदर बॅक या प्रमुख प्रजातींपैकी आॅलिव्ह रिडले जातीची दुर्मीळ कासवेच वायंगणी व तांबळडेग किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात असे निरीक्षण आहे. ग्रीन कासव व हॉक्सबिलने एक दोनदाच दर्शन दिले आहे. याठिकाणी गेली ३ वर्षे किरात ट्रस्ट व वायंगणी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या कासवांचा जन्म सोहळा केला जातो. याच्याबरोबरीने वायंगणी किनाऱ्यावरची डॉल्फिन सफर, खाडीतील मासेमारीचा अनुभव, वायंगणी-कोंडुरा जंगल ट्रेल, कासव संवर्धनाचे फिल्म शो, पाणी-पक्षी तज्ज्ञांशी गप्पा, दशावतार खेळ, अस्सल मालवणी पदार्थांची मेजवानी असे कार्यक्रम या कासव जत्रेच्या निमित्ताने घेण्यात येतो. यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने याठिकाणी हजेरी लावतात. परंतु अद्याप नोव्हेंबर महिना संपत आला तरी कासवांनी याठिकाणी प्रजननासाठी हजेरी लावली नसल्याने कासवमित्रांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जत्रेच्या तारखा लांबणार
कासवांच्या अंडी देण्याच्या प्रक्रियेनंतरच वायंगणी किनाऱ्यावर कासव जत्रेचे आयोजन केले जाते. मात्र नोव्हेंबर महिना संपत आला तरी कासवे अंडी देण्यासाठी किनाऱ्यावर आली नसल्याने कासव जत्रांच्या तारखा लांबण्याची शक्यता असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. दरवर्षी थंडीच्या दिवसात कासव अंडी देण्यासाठी किनाऱ्यावर येतात. मात्र, अद्याप तसे घडले नसल्याचे कासवमित्र सुहास तोरसकर यांनी सांगितले.