हत्ती पकड मोहिमेची प्रतीक्षा संपली
By admin | Published: February 6, 2015 11:07 PM2015-02-06T23:07:40+5:302015-02-07T00:12:26+5:30
उद्यापासून मोहीम : कुणकी हत्ती आज येणार
कुडाळ : हत्ती पकड मोहिमेची अखेर प्रतीक्षा संपली असून, कर्नाटक- म्हैसूर येथून निघालेल्या पाच प्रशिक्षित हत्तींसहीत २३ जणांचे पथक कुडाळ तालुक्यातील आंबेरीत उद्या, शनिवारी रात्री दाखल होणार आहे. दुसऱ्या दिवसांपासूनच हत्ती पकड मोहिमेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती कुडाळचे वनक्षेत्रपाल संजय कदम यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
गेली अनेक वर्षे विशेष करून कुडाळ तालुक्यात ठाण मांडून बसलेल्या हत्तींनी मोठ्या प्रमाणात येथील लोकांचे जीव घेतले. काही जणांना जखमी केले. करोडो रुपयांच्या मालमत्तेची हानी केली असून,, जनता भयभीत झाली आहे.
या तिन्ही हत्तींना पकडून प्रशिक्षित करण्यात यावे, याकरिता खासदार विनायक राऊत यांनी विशेष प्रयत्न केले. येथील परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, केंद्र सरकारने कर्नाटक सरकारच्या मदतीने कर्नाटकातील कुणकी हे प्रशिक्षित हत्ती व पथक येथे पाठवून येथील हत्तींना पकडून त्यांना प्रशिक्षित करण्याची मोहीम आखली होती. मात्र, काही कारणास्तव कर्नाटक सरकार या पथकाला प्रशिक्षित हत्ती नेण्यास परवानगी देत नव्हते. परंतु, त्यानंतर ३० जानेवारीला सरकारने हिरवा कंदील दाखविला.
त्यानुसार या पथकाला आवश्यक असणारा ५० हजारांचा प्रवास खर्च येथील वनविभागाने तत्काळ पाठविला. तसेच कामगार हत्तींचे विमेही उतरविण्याचे काम सुरू केले आहे. (प्रतिनिधी)