प्रतीक्षा : घाटांना निधीची; कामांना ठेकेदारांची
By Admin | Published: June 1, 2014 12:51 AM2014-06-01T00:51:00+5:302014-06-01T00:52:38+5:30
करुळ, भुईबावडा घाट : पावसाळ्यातील सुरक्षितता रामभरोसे
प्रकाश काळे ल्ल वैभववाडी करुळ घाटात ३ भगदाडे, ८ ते १० ठिकाणचे ठिसूळ कठडे तसेच दगडमातीने भरलेली गटारे व १० ते १२ ठिकाणी दरडीचा धोका संभवत आहे. तर भुईबावडा घाटात ५ ठिकाणी भगदाडे पडलेली असून बहुतांश कठडे ढासळण्याच्या स्थितीत आहेत. तर काही ठिकाणी रस्त्याची बाजूपट्टीच शिल्लक नाही. दरडींचा धोका तर जागोजागी आहे. त्यातही हा घाटमार्ग अरुंद त्यामुळे या मार्गावर धोक्याची तीव्रता अधिक जाणवते. मात्र, या परिस्थितीचे शासनाला अजिबात गांभिर्य दिसून येत नाही. हे यावर्षी न दिलेल्या निधीवरून स्पष्ट होत आहे. ‘बोल्डरनेट’बाबत अनास्था तीन वर्षांपूर्वी दोन्ही घाटांमध्ये दरडींना तारेच्या जाळ्या बसवून रस्त्यावर कोसळणारे ढिगारे रोखण्याचा ‘प्रयोग’ सार्वजनिक बांधकामने केला. तो बर्यापैकी यशस्वीही झाला. तरीही उर्वरित धोकादायक दरडींच्या ठिकाणी जाळ्या बसवण्यात आलेल्या नाहीत. त्याचे खरे कारण म्हणजे दरडी जेवढ्या जास्त प्रमाणात रस्त्यावर कोसळतात तेवढा जादाचा आर्थिक फायदा ‘खात्या’ला होत असतो. दरडी हटवण्याचे काम ‘युद्ध’ पातळीवर करण्याच्या नावाखाली होणार्या खर्चास ‘मर्यादा’ असत नाही. हाच नेमका जास्त दरडी कोसळल्यानंतरचा ‘खात्याचा’ फायदा असतो. म्हणूनच धोकादायक दरडींच्या ठिकाणी ‘बोल्डरनेट’ बसवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. पूर्वीच्या जाळ्याही दगड पडल्याने फाटल्या आहेत. साडेचार कोटींची मागणी संरक्षण कठडे, गटारे तसेच भगदाडांच्या दुरुस्तीसाठी करुळ घाटात अडीच तर भुईबावडा घाटातील २ कोटींच्या कामांचा आराखडा शासनाकडे पडून आहे. घाटमार्गांची सुरक्षितता संवेदनशील मुद्दा असूनही साडेचार कोटींपैकी पूरहानीअंतर्गत कामांसाठी शासनाने यावर्षी बांधकाम खात्याला छदामही दिलेला नाही. त्यामुळे या घाटमार्गाच्या बाजूपट्ट्यांना पडलेली भगदाडे तिसर्या पावसाळ्यातही तशीच राहणार आहेत. त्यामुळे भगदाडांच्या जागा रस्ता खचून वाहतुकीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे धुक्यामुळे भगदाडांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मंजूर कामांकडे ठेकेदारांची पाठ घाटामार्गातील ढासळलेल्या कठड्यांच्या पुनर्बांधणीची काही कामे पूर्वी मंजूर आहेत. त्यांना वर्ष उलटून गेले. मात्र घाटातील बांधकामांना जवळपास पाणी उपलब्ध नसल्याने ठेकेदार घाटातील कामे करण्यास पुढे येत नाहीत. त्यातच साहित्याची दरवाढ हा मुद्दा पुढे करून ही कामे परवडत नसल्याचे सांगून घाटातील कामांकडे पाठ फिरविली जात आहे. त्यामुळे करुळ आणि भुईबावडा घाटातील ढासळलेल्या कठड्यांच्या पुनर्बांधणीची मंजूर कामेही वर्षभरात झाली नाहीत. ठेकेदारांच्या प्रतीक्षेत असलेल्या कामांच्या जागी पावसाळ्यात आणखी रस्ता खचण्याची शक्यता आहे. कामे पावसाळ्यात केली जाण्याची शक्यता आहे. गटारांच्या सफाईकडे दुर्लक्ष करुळ, भुईबावडा घाटातील गटारांचे बहुतांश बांधकामच अद्याप झालेले नाही. तसेच दगड माती पडत असल्याने घाटमार्गाची गटारे भरलेली असून पाऊस तोंडावर आला तरी ती गाळ काढून मोकळी केलेली नसल्याने बर्याच ठिकाणी गटारांचे पाणी यंदा रस्त्यावरून वाहताना दिसणार आहे. त्याचा फटका छोट्या वाहनांना बसणार आहे. रस्त्याच्या पृष्ठभागाला पडलेले खड्डेही यंदाच्या पावसाळ्यात त्रासदायक ठरणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी यंदा अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. बांधकाम साहित्याचा अडथळा भुईबावडा घाटमार्ग अरुंद आहे. त्यातच काही ठिकाणी साईडपट्टी पुरेशी नसल्याने रस्ता गटाराला मिळालेला आहे. अशा परिस्थितीत घाटातील कामांसाठी लागणारी खडी, वाळू आदी साहित्य रस्त्यावरच ओतून ठेवल्यामुळे हे ढिगारे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. ते पावसापूर्वी न हटविल्यास पावसातील धुक्यामुळे अपघात होऊ शकतात. परंतु सार्वजनिक बांधकामने त्याकडेही काहीसे दुर्लक्ष केल्यामुळे वर्षभरापासून साहित्याचे ढिगारे रस्त्यावरच पडून आहेत.