प्रतीक्षा संयुक्त दशावताराची-
By admin | Published: May 17, 2016 10:47 PM2016-05-17T22:47:04+5:302016-05-18T00:18:06+5:30
-बदलत्या दशावताराला मिळतोय लोकाश्रय--बदलत्या दशावताराला मिळतोय लोकाश्रय
सुनील गोवेकर --आरोंदा --कोकणची लोककला दशावतार आपल्या जिल्ह्यात अनेक वर्षांपासून मनोरंजनाची महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आजच्या संगणक युगातही दशावतार पाहणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. दशावतारात काळानुसार बदल होत असून ट्रिकसिनच्या माध्यमातून दशावतार सादर केले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून संयुक्त दशावतार या संकल्पनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावोगावच्या दशावतारी नाटकातील अभिनय सम्राटांना एकत्रित करून उच्च प्रतीचे दशावतारी नाट्य सादर केले जात आहे. दर्जेदार अभिनय व सामाजिक प्रबोधनाचे नाट्य विषय यामुळे संयुक्त दशावताराला अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ट्रेंड बदललेल्या नव्या संयुक्त दशावताराला मिळालेला लोकाश्रय कोकणच्या वैशिष्ट्यांमध्ये मोलाची भर घालणारा ठरत आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून संयुक्त दशावताराच्या नाट्यप्रयोगांना सुरुवात होते. छोट्या-मोठ्या महोत्सवांबरोबरच गावांमधूनही ही नाटके सादर होत असतात; पण त्यामुळे दशावतारी प्रेमी नाट्यरसिकांना आता संयुक्त दशावताराची प्रतीक्षा लागली आहे. तर हे संयुक्त दशावतार भरविणारे मित्रमंडळ आणि संस्था यांचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे संयुक्त दशावतारी नाट्याची प्रेक्षकांना उत्कंठा लागून आहे.
कोकणची लोककला दशावतार आपल्या जिल्ह्यात अनेक वर्षांपासून मनोरंजनाची महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आजच्या संगणक युगातही दशावतार पाहणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता नोव्हेंबर महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेपासून जत्रोत्सवांना सुरुवात होते. जत्रोत्सवातील खास आकर्षण म्हणजे दशावतारी नाटक़ जत्रोत्सवात दशावतारी नाट्यप्रयोग हे पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळांच्या माध्यमातून सादर केले जातात. त्रिपुरारी पौर्णिमेला जत्रोत्सवांना सुरुवात होते. त्यानंतर जत्रोत्सव संपल्यानंतरही मे महिन्याच्या शेवटपर्यंत या कंपन्यांकडे नाट्य प्रयोगासाठी गावागावांतून मागणी असते. त्यानंतर संयुक्त दशावतारांच्या नाट्यप्रयोगांना सुरुवात होते .
गेल्या काही वर्षांपासून ‘संयुक्त दशावतार’ या संकल्पनेला नाट्य रसिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. संयुक्त दशावतारामध्ये जिल्ह्यातील नामवंत दशावतार कलाकारांचा समावेश केलेला असतो. त्यामुळे संयुक्त दशावताराचा प्रयोग असलेल्या ठिकाणी दुरवरून येत रसिक तुडुंब गर्दी करतात. या प्रयोगांमधून नामवंत कलाकारांमध्ये एक प्रकारची संवादाची जुगलबंदी पाहायला मिळते.
हे कलाकार दशावतारी कलाकारांमधील प्रसिद्ध कलाकार असल्याने रंगमंचावर त्यांच्याकडून सादर होणारी कला ही उच्च कोटीची असते. त्यात प्रकर्षाने जास्त महत्त्व दिसून येते ते कलाकाराला पुराणातील असलेलं गाढं ज्ञान, त्यांच्याकडे असणारं प्रसंगावधान व अभिनय कौशल्य. कारण अशा प्रयोगांसाठी दशावतारातील दिग्गज कलाकारांनाच निमंत्रित केलं जातं.
कोणतीही संहिता नसताना वेळेचं बंधन, कथानकाचा आशय याकडे प्रकर्षाने या कलाकारांना लक्ष द्यावे लागत असल्याने कलाकारांचीही जिल्ह्यातील रसिकांपुढे कसोटी असते. सर्वसामान्यपणे मे महिन्याच्या शेवटी संयुक्त दशावतारी नाटकांना सुरुवात होते. सध्या अर्धा मास लोटल्याने संयुक्त दशावतारी नाटकांची रसिकांना आस लागली आहे.
गावागावांतून संयुक्त दशावताराच्या नाटकांचे
आयोजन केले जातेच. शिवाय कुडाळ लाजरी ग्रुपच्या मान्सून महोत्सवामध्येही दशावतारातील दिग्गज कलाकारांना घेऊन संयुक्त दशावताराचे नाट्यप्रयोग सादर केले जातात. या महोत्सवाला होणारी गर्दी यावरूनच दशावतारातील
संयुक्त दशावतार या संकल्पनेला रसिकांचा मिळणारा प्रतिसाद सांगून जाते.
कोकणची परंपरा,
नावीन्य आणि लोकाश्रय
कोकणच्या कलावैभवाची समृद्ध परंपरा म्हणून दशावतारी नाटकाला महत्त्वाचे स्थान आहे. ऐतिहासिक पंरपरा असलेल्या या कलेत कालमानानुसार बदल केला जात आहे. यातील नावीण्य आणि सादरीकरणाची बदलेली आधुनिक कला यामुळे मुख्य दशावतार संस्कृतीला कसलीही बाधा कलाकारांनी येऊ दिली नसल्याने या कलेला मिळालेला लोकाश्रय कायम राहिला आहे.
दशावतारामुळे कोकण क्षेत्राला लोककलेत व संस्कृतीत मोलाचे स्थान आहे. यातील दहा अवतारांची मांडणी म्हणजे मनुष्याच्या विविध स्वभाव वैशिष्ट्यांची प्रचिती आहे. तर संयुक्त दशावतारानेही ही कला समृद्ध केली असून, याला मिळालेला प्रतिसाद हा संस्कृतीचाच भाग आहे. देशाच्या वैभव संपन्न संस्कृतीत आगामी काळात भर घालण्याचे कार्य संयक्त दशावतार करील.
- विजयकुमार फातर्फेकर, तज्ज्ञ व जेष्ठ अभ्यासक, दशावतारी नाट्यचळवळ, सावंतवाडी.