वेंगुर्ला आढावा बैठकीत ६७.७० लाखांचा पाणीटंचाई आराखडा अंतिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 05:24 PM2020-02-17T17:24:34+5:302020-02-17T17:28:50+5:30
वेंगुर्ला तालुका संभाव्य पाणीटंचाई आराखडा ६७.७० लाख रुपयांचा अंतिम करण्यात आला असून तो शासनास पाठविण्यात येणार आहे. तर यावर्षी निधी उपलब्ध असल्याने मंजुरी मिळालेली नियोजित कामे मार्चपूर्वी पूर्ण होतील, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. विंधन विहिरींच्या जागेचे प्रस्ताव कनिष्ठ भूवैज्ञानिक आयत्यावेळी फेटाळतात. मात्र सभेस उपस्थित राहत नसल्याबाबत लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका संभाव्य पाणीटंचाई आराखडा ६७.७० लाख रुपयांचा अंतिम करण्यात आला असून तो शासनास पाठविण्यात येणार आहे. तर यावर्षी निधी उपलब्ध असल्याने मंजुरी मिळालेली नियोजित कामे मार्चपूर्वी पूर्ण होतील, असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. विंधन विहिरींच्या जागेचे प्रस्ताव कनिष्ठ भूवैज्ञानिक आयत्यावेळी फेटाळतात. मात्र सभेस उपस्थित राहत नसल्याबाबत लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
वेंगुर्ला तालुक्याची संभाव्य पाणीटंचाई आराखडा आढावा सभा येथील साई मंगल कार्यालयात आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे, जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ, दादा कुबल, पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, जिल्हा पाणीपुरवठा अधिकारी श्रीपाद पाताडे, पंंचायत समिती सदस्य यशवंत परब यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
प्रथम पाताडे यांनी गतवर्षीचा पाणीटंचाई आराखडा व झालेली कामे याबाबत माहिती दिली. गतवर्षी मंजूर केलेल्या नळयोजना विशेष दुरुस्तीतील ९ कामांपैकी ४ कामे अद्याप प्रगतीपथावर आहेत. तात्पुरती पूरक नळयोजनांमधील २ कामांपैकी १ काम प्रगतीपथावर तर एका कामास कार्यारंभ आदेश प्राप्त नाहीत.
विंधन विहिरीच्या एकूण ५ कामांपैकी १ काम पूर्ण आहे. २ कामे बक्षिसपत्र झाली नाहीत तर २ कामे झालेली नाहीत. विहीर खोल करणे व गाळ काढणे या ९ कामांपैकी फक्त ३ कामे झाली असून ६ कामे झालेली नाहीत. एकूण ३८ कामांपैकी १७ पूर्ण व ५ कामे मार्चपूर्वी करण्याचे नियोजित असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल यांनी गतवर्षी मंजूर झालेल्या कामांना जो निधी मंजूर झाला होता, तो निधी १ वर्षांनंतर काम सुरू केल्यास वाढणार असून त्याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला. ज्या वर्षीची कामे त्याच वर्षी होण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे, असे सुचविले.
कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत यांनी विंधन विहिरींच्या जागेचे प्रस्ताव कनिष्ठ भूवैज्ञानिक आयत्यावेळी फेटाळतात. मात्र, या सभेला का उपस्थित राहत नाहीत? असा प्र्रश्न केला. यावर केसरकर यांनी पुढच्यावेळी त्यांना बोलविण्यात येईल, असे सांगितले. आजची ही टंचाईची आढावा बैठक घेत असताना निधीची तरतूद आहे का, ते प्रथम सांगावे. परबवाडा ग्रामपंचायतीतील एक काम मंजूर केले.
मात्र, त्याला निधी आला नव्हता. ग्रामपंचायतीने ते ठेकेदारामार्फत करून घेतले. त्यावेळी ठेकेदाराला पैशासाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार खेपा माराव्या लागल्या. याकडे परबवाडा सरपंच पपू परब यांनी लक्ष वेधले. यावर पाताडे यांनी यावर्षी भरीव निधी असल्याचे सांगितले. त्यानंतर खानोली, होडावडा, आडेली, वेतोरे, कुशेवाडा, रेडी या भागातीलही सरपंचांनी टंचाईच्या समस्या मांडल्या.
दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी वेंगुर्ला तालुक्यातील पाणीटंचाईबाबत ज्या अडचणी असतील त्या जिल्हा परिषदेपर्यंत आणाव्यात. त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील, असे सांगितले. सभेत उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार सभापती अनुश्री कांबळी यांनी मानले.
बक्षिसपत्र जमिनींबाबत तोडगा काढणार
आमदार केसरकर म्हणाले, तिलारीची नळपाणी योजना वर्षअखेरपर्यंत वेंगुर्ल्यापर्यंत येणार आहे. त्याचा फायदा वेंगुर्ल्याला होईल. तसेच टंचाईतील कामांसाठी सार्वजनिक विहिरीला दोन गुंठे जागा लागते. मात्र,येथील शेतकऱ्यांची जमीन आधीच कमी असते. त्यामध्ये दोन गुंठे बक्षिसपत्राने दिल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होते. याबाबत येणाऱ्या अडचणी आणि खनिकर्म भागातील जमिनीबाबत आपण ग्रामविकास मंत्री, महसूलमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढू, असे सांगितले.