कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम सुरू, पुढील वर्षी होणार निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 01:23 PM2021-12-15T13:23:54+5:302021-12-15T13:24:51+5:30
प्रभाग रचना ३१ डिसेंबरच्या ग्रामसभेमध्ये निश्चित करून प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत ही काढली जाणार आहे.
कणकवली : कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीची मुदत पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. तत्पूर्वी ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि प्रभाग निहाय आरक्षण जाहीर केले जाणार आहे. याची प्रक्रिया सध्या सुरू झाली असून अंतिम प्रभाग रचनेला २ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी मान्यता देणार आहेत. प्रभाग रचना ३१ डिसेंबरच्या ग्रामसभेमध्ये निश्चित करून प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत ही काढली जाणार आहे.
५८ ग्रामपंचायतींची ऑक्टोबर मध्ये मुदत संपणार !
कणकवली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. या सरपंच आरक्षणा प्रमाणे ३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका गेल्या वर्षी झाल्या. मात्र, कोरोनाच्या कालावधी काही पोटनिवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. सध्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम हा मागील कार्यक्रमानुसार सुरू आहे. मात्र, तालुक्यातील ६३ पैकी ५८ ग्रामपंचायतीची मुदत पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. त्यांच्या प्रभाग रचनेचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे.
४९२ सदस्य निवडले जाणार !
५८ ग्रामपंचायतीमध्ये ४९२ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. यासाठी १८८ प्रभाग रचना निश्चित केली जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडून गुगल अर्थ द्वारे नकाशे तयार करण्यात आले आहेत. तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पाहणीतून प्रभाग रचना आणि सिमांकन तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीने प्रभाग रचना तपासणी करून गटविकास अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या समवेत हा कार्यक्रम निश्चित केला आहे. प्रभाग रचना प्रस्ताव हा १६ डिसेंबरला उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी जाणार आहे. जिल्हाधिकारी यांनी नमुना व प्रारूप प्रभाग रचना, आरक्षण संबंधी तपासणी करून आवश्यक दुरुस्ती केल्यानंतर २१ डिसेंबरला मान्यता दिली जाणार आहे.
आरक्षण सोडत काढण्यात करिता विशेष ग्रामसभेमध्ये २७ डिसेंबरला सूचना देण्यात येणार आहे. विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्रारूप केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचना, आरक्षण सोडत, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, महिलांसह हे आरक्षण ३१ डिसेंबर रोजी काढले जाणार आहे. त्यानंतर प्रभाग रचनेतील यादीला प्रसिद्धी देऊन १० जानेवारी पर्यंत हरकती मागविल्या जाणार आहेत. आलेल्या हरकती आणि सूचना नोंदवून अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे २४ जानेवारीला हे प्रस्ताव जाणार आहेत. त्यानंतर प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना पाठवल्यानंतर जिल्हाधिकारी २ फेब्रुवारीला अंतिम प्रसिद्धी देणार आहे.
- तालुक्यातील ग्रामपंचायत प्रभागरचना !
- एकूण ५८ ग्रामपंचायती
- एकूण सदस्य ४९२
- एकूण प्रभाग १८८
- आरक्षण सोडत ३१ डिसेंबर