प्रभाग क्रमांक १ मध्ये तिरंगी तर २ मध्ये दुरंगी लढत रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2016 11:29 PM2016-04-05T23:29:33+5:302016-04-06T00:08:37+5:30

कुडाळ नगरपंचायत निवडणूक : उमेदवारांचे चित्र स्पष्ट ; जनतेच्या विश्वासावर सर्वांचेच भवितव्य अवलंबून-कुडाळ गावाकडून नगराकडे

In the ward no.1 will be triangular and 2 will play in the long duration | प्रभाग क्रमांक १ मध्ये तिरंगी तर २ मध्ये दुरंगी लढत रंगणार

प्रभाग क्रमांक १ मध्ये तिरंगी तर २ मध्ये दुरंगी लढत रंगणार

Next

रजनीकांत कदम =कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. १ कविलकाटे या प्रभागातील चुरशीची लढत ही काँग्रेस, शिवसेना व भाजप पुरस्कृत उमेदवार यांच्यात होणार तर प्रभाग क्र.२ भैरववाडी प्रभागात लढत काँग्रेस व शिवसेना उमेदवार यांच्यात दुरंगी होणार असून येथील मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे लवकरच समजणार आहे.
कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक १७ एप्रिल रोजी होत असून ४ एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. यावेळी सर्व प्रभागातील एकूण ११ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता याठिकाणी प्रत्येक प्रभागातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या दरम्यान प्रभाग क्र. १ कविलकाटे मस्जिद मोहल्ला या प्रभागाचा विचार करता या प्रभागात कविलकाटे व मस्जिद मोहल्ल्याचा अंशत: भाग येत आहे. या ठिकाणी खुला प्रवर्ग असे आरक्षण पडले आहे. या प्रभागात एकूण ८०४ एवढे मतदार आहेत. यामध्ये पुरुष ४१९ व महिला मतदार ३८५ आहेत.
या प्रभागातून सावळाराम जळवी (काँग्रेस), समील जळवी (काँग्रेस), महेंद्र्र वेंगुर्लेकर (शिवसेना), हेमंत मातोंडकर (अपक्ष), नसरुद्दिन काजरेकर (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. यामध्ये काँग्रेसच्यावतीने दोन उमेदवारी अर्ज होते. त्यापैकी समील जळवी याने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस, शिवसेना या उमेदवारांसहित काशिराम मातोंडकर यांनी अपक्ष मधून अर्ज भरला होता. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांची उमेदवारी ही भाजप पुरस्कृत होत असून याबरोबर एक अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
दरम्यान, या प्रभागातील विकास कामांचा विचार करता सर्व प्रभागांमध्ये असलेल्या मुलभूत सोयी सुविधांचा प्रश्न, समस्या याही प्रभागात जाणवत आहेत. विशेष करून हा प्रभाग भौगोलिकदृष्ट्या मोठा असून काही ठिकाणी योग्य प्रमाणात अजूनही रस्ते व्यवस्थितरित्या झालेले नाहीत, तसेच पाणी समस्या व इतर मुलभूत सोयी सुविधांचा अभाव असे प्रश्न याठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत.
या प्रभागात खरी लढत ही काँग्रेस व शिवसेना व भाजप प्रणित उमेदवार यांच्यात होणार असून आतापर्यंतच्या येथील राजकीय इतिहासात या प्रभागावर शिवसेनेचे वर्चस्व हे शिवसेना उमेदवारासाठी जमेची बाजू आहे तर शिवसेनेची सत्ता असून या प्रभागातील जर काही विकासकामे रखडली असतील किंवा झाली नसतील तर ही काँग्रेस उमेदवारासाठी जमेची बाजू आहे तसेच काँग्रेसचा उमेदवार हा नवीन चेहरा असल्याने तीही एक जमेची बाजू काँग्रेसच्या बाबतीत आहे.
तसेच काशिराम मातोंडकर यांनी अपक्षमधून अर्ज भरला होता. मात्र, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आपली उमेदवारी ही भाजप पुरस्कृत केल्याने आता या प्रभागातील लढतीत खऱ्या अर्थाने चुरस निर्माण होणार हे निश्चित आहे.
तर प्रभाग क्र. २ भैरववाडी, पानबाजार या प्रभागाचा विचार करता या प्रभागात भैरववाडी, पानबाजार अंशत: या वाड्या येत असून येथे खुला प्रवर्ग आरक्षण पडले आहे. या प्रभागात एकूण मतदार संख्या ७९३ एवढी असून यापैकी पुरुष ३९० व महिला ४०३ मतदार आहेत.
येथील प्रभागात अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण किंवा डांबरीकरण करणे, नळपाणी योजना घराघरात पोहचविणे, ड्रेनेज व्यवस्था निर्माण करणे, पथदीप लावणे, अंतर्गत गटार व सांडपाणी सोडण्याची व्यवस्था करणे, मच्छीमार्केटमधील सांडपाणी तसेच कचऱ्याचा प्रश्न सोडविणे, शौचालये, उघडी गटारे, शेतकऱ्यांसाठी विशेष पाणी योजना राबविणे, रस्त्यावरील तीव्र वळणावर गतिरोधक बसविण्याबाबत पाठपुरावा करणे, भंगसाळ नदीच्या पुराचे पाणी अनेकदा या प्रभागातील रस्त्यांवर येते, पावसाळ्यात गटार तुंबतात असे अनेक प्रश्न, समस्या येथील प्रभागात असून याबाबत येथील लोकांनी वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले. मात्र, समस्या जैसे थे राहिल्या आहेत.
अनेक प्रश्न, समस्या या प्रभागात आहेत. त्यामुळे या समस्या सोडवून जनतेला सोयी सुविधा देण्याचा जो कोण विश्वास देईल त्याच्याच मागे येथील जनता राहणार आहे. या प्रभागात काँग्रेसकडून ओंकार तेली व शिवसेनेकडून राजन नाईक हे उमेदवारी लढवित आहेत. याठिकाणी इतर पक्षाच्या व अपक्ष म्हणून कोणीही अर्ज भरलेला नाही.
कुडाळ शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या प्रभागामध्ये काही प्रमाणात मुलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे येथील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी विकासाचा अजेंडा कोण प्रखरपणे मांडतो व जनता त्याच्यावर किती विश्वास ठेवते यावर येथील उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.

काँग्रेसला कडवी झुंज
दरम्यान, प्रभाग क्र. १ मधून तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य हे महेंद्र वेंगुर्लेकर होते व त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षातून उमेदवारी अर्ज भरला आहे. व त्यांच्यासमोर काँग्रेसने तेथीलच सावळाराम जळवी यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसला या ठिकाणी विजयासाठी झुंज द्यावी लागणार हे मात्र निश्चित.
काँग्रेसकडून नवीन युवा चेहरा
काँग्रेसच्यावतीने उमेदवार असलेले ओंकार तेली हे नवीन व युवा चेहरा काँग्रेसने दिला असून त्याच्या बाजूने प्रभागातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात असू शकतो ही संभावना आहे. त्यामुळे ही काँग्रेसची जमेची बाजू असू शकते.
भाजपचा उमेदवार नाही
प्रभाग २ मध्ये विशेष म्हणजे भाजपने उमेदवार दिलेला नाही. काही प्रभागात उमेदवार मिळाले नसल्याचे कारण भाजपच्यावतीने सांगण्यात आले होते. दरम्यान, भाजपचा उमेदवार नसल्यामुळे येथील भाजपची मते कुठे जातील, कोणाला मिळतील याबाबत प्रश्नचिन्हच आहे.
दहा वर्षे नळपाणी योजनेच्या पाण्याची प्रतीक्षाच
प्रभाग १ मध्ये ग्रामपंचायत असतानाच सुरु असलेल्या नळपाणी योजनेच्या टाकीचे काम पूर्ण न झाल्याने येथील बावकरवाडी, मळीवाडी या ग्रामस्थांना गेली १० वर्षे एप्रिल, मे महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. या प्रभागाचा राजकीय इतिहास पाहता आतापर्यंत या ठिकाणाहून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी जास्तीत जास्त शिवसेना पक्षाकडून गेले आहेत. येथील तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य व सध्याचे उमेदवार महेंद्र वेंगुर्लेकर हे शिवसेना पक्षाचेच आहेत.
अपक्षांवर निकाल अवलंबून
या प्रभाग क्र. १ ला मस्जिद मोहल्याचा अंशत: भाग जोडलेला आहे. तसेच या ठिकाणी नसरुद्दिन काजरेकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. त्यामुळे या समाजाची मते कोणाकडे जाणार हे ही महत्त्वाचे आहे. येथील अपक्ष यांना किती मते पडतील यावरही येथील निकाल अवलंबून राहणार आहे.

Web Title: In the ward no.1 will be triangular and 2 will play in the long duration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.