सिंधुदुर्ग : वैभववाडी पंचायत समिती इमारतीवरून साटविलकर यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:25 PM2018-09-21T13:25:42+5:302018-09-21T13:31:07+5:30

वैभववाडी पंचायत समिती ईमारत २०१४ ला मंजूर होऊन २०१६ ला ती पूर्ण करावयाची होती. मात्र, आॅगस्ट २०१८ संपला तरी ही ईमारत पूर्णत्वास गेलेली नाही.

Warnivalkar's warning on the Vaibhavwadi Panchayat Samiti building | सिंधुदुर्ग : वैभववाडी पंचायत समिती इमारतीवरून साटविलकर यांचा इशारा

सिंधुदुर्ग : वैभववाडी पंचायत समिती इमारतीवरून साटविलकर यांचा इशारा

ठळक मुद्देदोषींवर कारवाई करणारच : संतोष साटविलकर जिल्हा परिषद बांधकाम समिती सभा

ओरोस : वैभववाडी पंचायत समिती ईमारत २०१४ ला मंजूर होऊन २०१६ ला ती पूर्ण करावयाची होती. मात्र, आॅगस्ट २०१८ संपला तरी ही ईमारत पूर्णत्वास गेलेली नाही. पावसाळ्यात या इमारतीला गळती लागली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेची बदनामी होत आहे. कोणामुळे जिल्हा परिषदेची बदनामी होत असल्यास ती आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे याबाबत वस्तुस्थिती अहवाल आपल्याला सादर करावा.

मक्तेदार, वैभववाडी जिल्हा परिषद बांधकाम किंवा जिल्हास्तर जिल्हा परिषद बांधकाम अधिकारी याला जबाबदार असले तरी यातील कोणालाही सोडणार नाही. दोषींवर कारवाई करणारच, असा इशारा झालेल्या बांधकाम समिती सभेत सभापती संतोष साटविलकर यांनी दिला.

जिल्हा परिषदेच्या नाथ पै सभागृहात सभापती साटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी सभा सचिव तथा कार्यकारी अभियंता प्रकाश खांडेकर, सदस्य रवींद्र जठार, जेरॉन फर्नांडिस, संजय आंग्रे, प्रदीप नारकर, राजेश कविटकर, यांसह खातेप्रमुख व अन्य अधिकारी उपस्थित होते. आजच्या सभेत सभापती साटविलकर यांनी रुद्रावतार धारण केल्याचे दिसत होते. सभा सचिव खांडेकर यांच्यापासून दोषी आढळलेल्या सर्वच अधिकाऱ्यांची त्यांनी खरडपट्टी काढली.

सदस्य जठार यांनी वैभववाडी पंचायत समिती इमारतीचा विषय काढत हि इमारत कधी पूर्ण होणार ? त्यांना मुदत वाढ किती देणार? दोषींवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी वैभववाडी उपअभियंतानी इमारतीचे काम ९0 टक्के पूर्ण झाले आहे, असे सांगितले.

 खांडेकर यांनी ठेकेदार प्रत्येक वेळी दोन-तीन महिन्यात पूर्ण करतो असे सांगतो, पण प्रत्येक्षात काम पूर्ण करीत नसल्याचे सांगितले. यावरती साटविलकर यांनी, त्या कामामुळे जिल्हा परिषदेची बदनामी होत आहे. ती आम्ही खपवून घेणार नाही. दोषींवर कारवाई हि होणारच असा निर्धार व्यक्त केला.

अध्यक्षांचा अपमान केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच

जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत यांचा सावंतवाडी पंचायत समिती मासिक सभेत अपमान करणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच, असे साटविलकर यांनी सांगितले. तर खांडेकर यांनी खुलासा करण्याची नोटीस सदर अधिकाऱ्याला दिली आहे. त्याचे उत्तर मिळाल्यावर कारवाई करणार असे सांगितले. यावरून साटविलकर यांनी खांडेकर यांना चांगलेच झापले.

मी तुमच्या जवळ याबाबत खुलासा मागितला होता. त्याचे उत्तर तुम्ही दिला नाहीत, हे तरी तुम्हाला माहीत आहे का ? अस उलट प्रश्न खांडेकर यांना करत येत्या चार दिवसात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असे आदेश साटविलकर यांनी दिले. जठार यांनी हा प्रश्न उपस्थित करत प्रशासन कारवाई करणार कि जिल्हा परिषद सदस्यांनी कारवाई करावी, असा इशारा दिला होता.

देवगडचे खड्डे बुजविण्याचे दोन लाख गेले कुठे

सदस्य नारकर यांनी जिल्हा परिषदेच्या देवगड विभागाला खड्डे बुजविण्यासाठी देण्यात आलेले दोन लाख रुपयांचा निधी गेला कुठे असा प्रश्न करीत या निधीतून एकही खड्डा बुजविण्यात आलेला नाही, असा आरोप केला. हा निधी न वापरता बांधकाम विभागाने ग्रामपंचायतला पत्र पाठवत खड्डे बुजविण्यास सांगितले आहे, असे सभागृहाच्या निदर्शनास आणले.

यावरती देवगडच्या अधिकाऱ्यांनी उपलब्ध निधीतील खड्डयांची अंदाजपत्रके तयार करून त्याला प्रशाकीय मंजुरी घेण्यात आलेली आहेत. त्याची निविदा आता जाहीर होणार आहे. या निधीतून एकही खड्डा बुजविण्यात आलेला नाही असे सांगितले. त्यामुळे नारकर यांच्या आरोपात तथ्य असल्याचे निष्पन्न झाले.

यावरती कार्यकारी अभियंता खांडेकर यांनी, खड्डे बुजविल्याचे आपल्याला फोटो व यादी प्राप्त झाल्याचे सांगितले. अखेर साटविलकर यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले.

Web Title: Warnivalkar's warning on the Vaibhavwadi Panchayat Samiti building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.