"गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, तेव्हा खासदार विनायक राऊत झोपले होते का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 03:34 PM2020-08-17T15:34:42+5:302020-08-17T17:11:18+5:30
जिल्ह्यातील काही जुन्या प्रकरणांचा पुन्हा नव्याने तपास करणार असल्याचे खासदार विनायक राऊत सांगत आहेत. मग गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, त्यावेळी खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक झोपले होते का? असा प्रतिटोला भाजपा नेते, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी लगावला आहे.
कणकवली : अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात काही शिवसेना नेत्यांची नावे असल्याची चर्चा सुरू झाली. त्याविषयी खासदार नारायण राणे यांनी आवाज उठविल्यानंतर विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने जिल्ह्यातील काही जुन्या प्रकरणांचा पुन्हा नव्याने तपास करणार असल्याचे खासदार विनायक राऊत सांगत आहेत. मग गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, त्यावेळी खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक झोपले होते का? असा प्रतिटोला भाजपा नेते, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी लगावला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपा नेत्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यात दोन कोविड तपासणी लॅब उभ्या झाल्या. याचा पोटशूळ सत्ताधारी नेत्यांना आहे. मात्र, राणेंच्या कोविड लॅबचे राजकारण नको. कारण अत्यावश्यक असलेल्या लोकांना कोविड अहवाल तत्काळ मिळत आहेत.
शिवसेनेच्या नेत्यांना केवळ राजकारणापलीकडे काहीच दिसत नाही. आता जुन्या गुन्ह्यांबाबत वक्तव्य करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीच संबंधित गुन्ह्यांबाबत पोलिसांनी तपास केलेला आहे. मग पुन्हा तपास करणार असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल खासदार राऊत यांनी करू नये.
अनेकदा अशा तपासाच्या घोषणा शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या आहेत. जर खरोखरच या गुन्ह्यात काही तथ्य होते आणि त्याचा छडा लावायचा होता तर या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर असताना विनायक राऊत यांनी का प्रयत्न केले नाहीत ? केसरकर यांना राणे विरोधाचे श्रेय मिळेल म्हणून त्यांनी तसे केले नाही का? याचे उत्तर द्यावे.
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केवळ खासदार राऊत दिखाऊपणा करीत आहेत. सध्या सिंधुदुर्गात दर दिवशी कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारी रुग्णालयात कोविड लक्षणे नसल्यास तपासणी केली जात नाही. त्यामुळे पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये कोविड लॅब झाल्यानंतर काही लोक राजकारण करीत आहेत.
या काळात जिल्ह्यातून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या लोकांना ताबडतोब अहवाल मिळत आहे. तसेच जिल्ह्यातील नोकरीनिमित्त जाणारे नागरिक, शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी व अन्य लोकांसाठी पडवेतील ही लॅब अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. रत्नागिरीतील वालावलकर हॉस्पिटल येथील कोविड तपासणी लॅब बंद करण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी ही लॅब फार महत्त्वाची आहे.
राणेंच्या हॉस्पिटलमध्ये अत्यंत कमी दरात डायलिसीस
नारायण राणे यांच्या हॉस्पिटलमुळे न होऊ शकणाऱ्या शस्त्रक्रिया जिल्ह्यात होत आहेत. अत्यंत कमी दरात डायलिसीस सेवा तिथे सुरू आहे. जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये किती डायलिसीस होतात आणि जिल्ह्यात किती रुग्ण आहेत याचाही हिशोब खासदारांनी घ्यावा. मग कदाचित त्यांच्या मानेवरचे राणे विरोधाचे भूत उतरेल. असेही काळसेकर यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.