घड्याळाच्या मदतीने धनुष्याला धोबीपछाड
By admin | Published: October 27, 2015 11:32 PM2015-10-27T23:32:26+5:302015-10-28T00:07:06+5:30
भाजपची आश्चर्यकारक भूमिका : युतीमध्ये निर्माण झालेली दरी अधिकच रूंदावली
घड्याळाच्या मदतीने धनुष्याला धोबीपछाड
भाजपची आश्चर्यकारक भूमिका : युतीमध्ये निर्माण झालेली दरी अधिकच रूंदावली
मनोज मुळ्ये-रत्नागिरी
ििवधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेमध्ये निर्माण झालेली दरी राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही मिटलेली नाही, असे चित्र रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार दिसू लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत, पोटनिवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत न जाण्याचीच भूमिका घेतली आहे. देवरूखमध्ये झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीतही हीच बाब अधोरेखित झाली आहे. देवरूखात राष्ट्रवादीला सोबत घेत शिवसेनेला धोबीपछाड देण्याचा भाजपचा डाव रत्नागिरीतही रंगण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपाचा समझोता शेवटच्या क्षणापर्यंत झाला नाही आणि दोन्ही पक्ष एकमेकांच्याविरोधात उभे राहिले. रत्नागिरीमध्ये शिवसेनेकडून उदय सामंत आणि भाजपकडून बाळ माने यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली. तेव्हापासून रत्नागिरीतील भाजप- शिवसेनेत मोठी दरी निर्माण झाली. उदय सामंत आणि बाळ माने हे सलग तीनवेळा एकमेकांच्याविरोधात निवडणूक लढले. त्यामुळे ते कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळेच शिवसेना - भाजपमध्ये आता सलगी होण्याची शक्यता दुरावली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेच्या तुलनेत भाजपची ताकद खूपच कमी आहे. पण काही ठिकाणी शिवसेनेला भाजपची गरज लागते. विधानसभा निवडणुकीत पाचपैकी तीन जागी शिवसेना विजयी झाली असली आणि भाजपच्या वाट्याला काहीही आले नसले तरी दोन्ही पक्ष एकत्र असते तर जिल्ह्यात आणखी एक मतदार संघ युतीच्या पदरात पडला असता. ताकद अल्प असली तरी भाजपने ताठर भूमिका घेतली आहे. कोणत्याही स्थितीत शिवसेनेशी हातमिळवणी करायची नाही, अशी अघोषित भूमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
सध्या या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात इतकी टोकाची भूमिका घेतली आहे की, त्यामुळे भविष्यात जिल्हा पातळीवर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता दिसत नाही. शिवसेनेसारख्या मोठ्या पक्षाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली असली तरी जिल्ह्यात कोठेही भाजपचे पक्षवाढीचे काम नियोजनबद्ध रितीने सुरू नसल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेनेला विरोध : प्रदेश स्तरावरून पाठिंबा?
रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन लढवली होती. अध्यक्षपद दोन्ही पक्षांमध्ये वाटून घेण्याचा निर्णय झाला. पण मध्येच आलेल्या विधानसभा निवडणुकीत माशी शिंकली आणि युती तुटली. त्यानंतर भाजपचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. विधानसभेतील कटुतेमुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी हा निर्णय घेतला असावा, असा अंदाज आधी वर्तवला गेला. मात्र, त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यावर भाजपने शिवसेनेला धोबीपछाड देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांना शिवसेना विरोधासाठी वरिष्ठ स्तरावरूनच पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.
बाळ माने उदय सामंत
गेली काही वर्षे रत्नागिरीतील राजकारण हे भाजपचे बाळ माने आणि आधीचे राष्ट्रवादीचे व आताचे शिवसेनेचे उदय सामंत यांच्याभोवतीच फिरत आहे. सध्या राज्यात युती असतानाही या दोन्ही पक्षातील स्थानिक नेते एकत्र न येण्याला हेच गणित कारणीभूत आहे.
रत्नागिरीतील पोटनिवडणूक
रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी स्वतंत्र गट करून शिवसेनेला पाठिंबा दिला. ते चारजण अपात्र झाल्यामुळे होत असलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला पराभूत करण्यासाठी भाजप-शिवसेनेला एकत्र येण्याची संधी होती. मात्र, जागा वाटपाचे निमित्त करून हे दोन्ही पक्ष एकत्र आलेले नाहीत. आतापर्यंत झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपने शिवसेनेला अधिक जागा देऊ केल्या होत्या. मात्र, आता भाजपची ती तयारी नाही. अर्थात जागा वाटपाची चर्चा फिस्कटली, हे केवळ दाखवण्याचे कारण आहे. देवरूखात राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणारी भाजप आता रत्नागिरीतील पोटनिवडणुकीत आतून राष्ट्रवादीला साथ देण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे.
मंडणगडमध्ये एकला चलो अभियान
मंडणगडमध्ये नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतीची पहिलीच निवडणूक १ नोव्हेंबरला होत आहे. आतापर्यंत आधी काँग्रेस आणि नंतर शिवसेनेने मंडणगडवर आपला वरचष्मा ठेवला आहे. मात्र, तरीही भाजपने कोणताही समझोता न करताच थेट सर्व जागा लढवण्याची भूमिका घेतली आहे. १७पैकी १५ जागांवर भाजपने आपले उमेदवार उभे केले आहेत. मंडणगडमध्ये शिवसेनेची ताकद मोठी असतानाही भाजपने घेतलेली स्वबळाची भूमिका धक्कादायक आहे. इथून पुढे सर्वच निवडणुकांमध्ये भाजपची स्वबळाचीच भूमिका असेल, असे चित्र आत्ता तरी निर्माण झाले आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे पदाधिकारी मात्र अधिकच दक्ष झाले आहेत.