विर्डी-तळेखोल येथे कचऱ्याचे ढीग
By admin | Published: December 16, 2014 09:54 PM2014-12-16T21:54:01+5:302014-12-16T23:42:54+5:30
ग्रामस्थांचा आरोप : गोव्यातील व्यावसायिकांकडून प्रकार
दोडामार्ग : महाराष्ट्र व गोवा राज्याच्या सीमेवर दोडामार्ग तालुक्यातील
विर्डी-तळेखोल रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी मोठ्या प्रमाणात अज्ञात व्यक्तींकडून कचरा आणून टाकला जात आहे. हा कचरा नजीकच्या गोवा राज्यातून आणून टाकला जात असावा, असा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही अशाचप्रकारे गोव्यातील काही व्यावसायिकांना कचरा टाकताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडून पुन्हा कचरा न करण्याबाबत चांगलीच तंबी दिली होती; पण वर्षभरानंतर पुन्हा एकदा कचरा टाकण्यासाठी गोव्याकडून दोडामार्ग तालुक्याचा वापर होत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोडामार्ग तालुका गोवा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर वसला आहे. याच तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तळेखोल-विर्डी गावाचा गोव्यातील काही व्यावसायिकांकडून कचऱ्याचे डंपिंग करण्यासाठी वापर होऊ लागला आहे. ही दोन्ही गावे गोवा राज्याच्या सीमेला लागूनच हाकेच्या अंतरावर असल्याने गोव्यातील कचरा अज्ञातांकडून आणून टाकण्याचे काम केले जात आहे.
या कचऱ्यात टाकाऊ जैविक वस्तूंचा जास्त समावेश आहे. त्यात सुया, इंजेक्शने तसेच काचेच्या बाटल्या व झोपण्याच्या गादीत वापरल्या जाणाऱ्या लगद्यांचा समावेश आहे. शिवाय मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या पिशव्यांमध्ये जनावरांच्या शरीरावरील टाकाऊ मांस भरून त्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
हा कचरा गोव्यातूनच आणून टाकला जात असावा, असा संशय परिसरातील ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)
ग्रामस्थांकडून व्यावसायिकांना समज
यापूर्वीही अशाच पद्धतीने रात्रीच्यावेळी कचरा टाकताना गोव्यातील काही व्यावसायिकांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले होते.
त्यावेळी त्यांना यापुढे कचरा न टाकण्याबाबत सूचना करण्यात आली होती. त्यानंतर कचरा टाकणे बंद होते.
परंतु, पुन्हा एकदा गोव्याकडून दोडामार्ग तालुक्याचा कचऱ्यासाठी डंपिंग ग्राऊंड म्हणून वापर होऊ लागला आहे.
त्यामुळे विर्डी-तळेखोल परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे.