आंबोलीतील पर्यटन व्यवसायावर 'पाणी'
By admin | Published: July 6, 2014 12:28 AM2014-07-06T00:28:55+5:302014-07-06T00:31:14+5:30
पर्यटकांची पाठ : पावसाअभावी व्यावसायिक आर्थिक अडचणीत
महादेव भिसे ल्ल आंबोली
पाऊस म्हटल्यावर सगळ्यांचाच आवडता. त्यातच पावसाळ्यात आंबोलीस फिरण्यासासाठी येणे म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच. चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहतो, त्याचप्रमाणे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक तसेच जिल्ह्यातील पर्यटक व आंबोलीतील तमाम पर्यटन व्यावसायिक पावसाची वाट पाहत असतात. कारण आंबोलीतील पर्यटन. मात्र, पावसाने यावर्षी पूर्णपणे पाठ फिरविली आहे. त्यामुळे आंबोलीतील पर्यटन व्यवसायावर त्याचा परिणाम होऊन व्यावसायिकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. दरवर्षी जुलै महिन्यापर्यंत होणाऱ्या लाखोच्या मिळकतीवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे.
श्रावण मास सुरू झाल्यावर आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावते. यावर्षी २२ जुलै रोजीच श्रावणाची सुरुवात होत आहे. श्रावण महिना म्हटल्यावर, सणासुदीचा कालावधी सुरू होतो. या मासात धार्मिक नागरिक मांसाहार हेतूपुरस्सर टाळतात आणि तळीराम पर्यटकही श्रावण मासात सभ्य गृहस्थ बनतात. त्यामुळे या कालावधीत आंबोलीत पर्यटकांचा शुकशुकाट असतो. पर्यटन व्यवसायावरही याचा परिणाम होतो.
आंबोलीतील पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने हताश करणारी गोष्ट म्हणजे, यावर्षी अद्यापपर्यंत मिरगानंतर केवळ पाच दिवस पाऊस पडला आणि तोही तुरळकच. जुलै महिन्याच्या सुरुवातीपर्यंत आंबोली येथे १२५ इंचापर्यंत पावसाची नोंद होते. यामुळे आंबोलीतील मुख्य धबधब्यासह सर्व धबधबे पूर्णपणे प्रवाहीत होत असतात. पावसाळ्यातील चार महिन्यात सूर्याचे दर्शनही दुर्लभ असते. रिमझिम पडणारा पाऊस, धुक्यात हरवलेल्या वाटा आणि त्यांच्या बाजूने फेसाळणारे धबधबे असे पावसाळ्यातील मनमोहक दृश्य पर्यटकांना भावते. त्यामुळेच दरवर्षी आंबोलीतील पर्यटकांच्या संख्येत हजारोंच्या संख्येने वाढ होत आहे.
आंबोलीतील हॉटेल्समधील पावसाळी पर्यटनासाठीचे आरक्षण दोन ते तीन महिने आगाऊ गेले जाते. यावर्षीही आंबोली येथील सर्व हॉटेल्स पर्यटकांनी आरक्षित केली होती. परंतु पाऊस नसल्याने आंबोलीतील धबधबे प्रवाहीत झाले नाहीत. आंबोलीतही अन्य ठिकाणांप्रमाणे उन्हाचा मारा सहन करावा लागत होता. यामुळेच पर्यटकांनी दोन ते तीन महिन्यांपूर्वी केलेली आरक्षणे रद्द केली. सद्यस्थितीत काही प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे आंबोलीत काही प्रमाणात पर्यटक येतात. परंतु पावसाला जोर नसल्याने आणि धबधबे प्रवाहित झाले नसल्याने पर्यटकांना माघारी फिरावे लागत आहे.