मे महिन्यात जाणवणार जलसंकटाचे चटके ?
By admin | Published: April 16, 2017 11:21 PM2017-04-16T23:21:54+5:302017-04-16T23:21:54+5:30
बाष्पीभवनाचे ग्रहण : विहिरीतील पाण्याने आताच गाठला तळ
प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी
जिल्ह्यात गेल्या हंगामात पाऊस मोठ्या प्रमाणात पडूनही यावेळी तापमानात मोठी वाढ झाल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग खूप वाढला आहे. महिनाभरापासून सतत वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहेच, परंतु उपलब्ध पाणी साठ्याला बाष्पीभवनाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे येत्या मे महिन्यात जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी आतापासूनच विहिरींतील पाण्याने तळ गाठला असून, पाणी खरवडून काढण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील अनेक गावे यावेळी पाणीटंचाईच्या संकटात सापडली आहेत, तर काही गावांवर पाणीटंचाईची तलवार टांगली गेली आहे. संगमेश्वर तालुक्यात १९ गावांमधील ३३ वाड्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट आवासून उभे ठाकले आहे. गावे व वाड्यांची ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या ज्या गावांमध्ये टंचाईचे संकट आहे, त्यामधील ५ गावांतील वाड्यांनाच २ टॅँकरद्वारे दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. उर्वरित १४ गावे व त्यामधील टंचाईग्रस्त वाड्यांना पाणी कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील कातुर्डी कोंड या गावात सर्वप्रथम पाण्याचा टॅँकर धावला. त्यानंतर बेलारी, माची -धनगरवाडी, निवळी - धनगरवाडी, श्रुंगारपूर, कातुर्डी नेरदवाडी व अन्य वाड्यांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
चिपळूण तालुक्यात टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या २८ झाली आहे. त्यापैकी ६ गावांतील १२ वाड्यांना सध्या टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. अजूनही पाच गावे व १६ वाड्या तहानलेल्या आहेत. या गावांमध्ये पाणी पुरवठ्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. खेड तालुक्यातील १६ गावांमधील वाड्यांना टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, अजून असंख्य गावे व वाड्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या असून, त्या गावांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा, गुहागर व दापोली तालुक्यातही अनेक गावे व वाड्यांनी टंचाईमुळे पाणी पुरवठ्याची मागणी केली आहे. टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची सध्याची संख्या पाहता तापमान वाढीने हे जलसंकट मे महिन्यात अधिकच भयावह होण्याची भीती आहे. जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने तापमान वाढत असून, ३७ ते ३८ अंशांवर तापमान पोहोचले आहेत.
मध्यम प्रकल्पातही पाणी...
जिल्ह्यात नातूवाडी मध्यम प्रकल्पात व अर्जुना (राजापूर) या मध्यम प्रकल्पातही चांगला पाणीसाठा आहे. परंतु लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतील पाणी जलसिंचनाप्रमाणेच स्थानिक गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांना कितपत पुरेल, याबाबत शंका व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील ९१ पाणी योजना धरणांच्या शेजारी जॅकवेल उभारून चालविल्या जातात. मात्र, जिल्ह्यातील अन्य नळयोजनांना या धरणांमधील अतिरिक्त पाणीसाठ्याची उपलब्धता होत नाही.