तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 15, 2024 07:35 PM2024-07-15T19:35:57+5:302024-07-15T19:36:39+5:30

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) : तालुक्यात सध्या मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे तिलारी धरणातील पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊन ...

Water discharge from Tilari dam has started, vigilance warning to the riverside villages | तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

तिलारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग) : तालुक्यात सध्या मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे तिलारी धरणातील पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊन धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सोमवारी सकाळी पहाटेच्या सुमारास धरणाच्या चारही दरवाजांतून विसर्ग सुरू झाला असून, ४६.३८ क्युसेक्स (घ.मी. प्रति सेकंद) पाणी बाहेर पडत असल्याचे अधिकाऱ्यांंनी सांगितले आहे.

तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. परिणामी सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तालुक्यातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील मुख्य व मोठे असलेल्या तिलारी धरणातील पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. मुसळधार पावसामुळे धरणाच्या सभोवताली असलेल्या डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात जमा होते. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे हे धरण सोमवारपर्यंत भरून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.

रविवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास धरणाची पाणी पातळी १०५.२० मीटर झाली होती, तर धरणाची सांडवा माथा पातळी १०६.७० मीटर झाल्यास पाण्याचा विसर्ग केला जातो. सोमवारी पहाटे ३:४५ वा.च्या सुमारास या पातळीत वाढ होऊन सांडवा माथा पातळी ओलांडली व धरणाच्या चारही दरवाजांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. सध्या ४६.३८ क्युमेक्स प्रति सेकंद विसर्ग सुरु आहे.

हे पाणी पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीला येऊन मिळते. शिवाय तेरवण मेढे उन्नैयी बंधाऱ्यातून विसर्ग होणारे पाणीदेखील तिलारी नदीपात्रात येऊन मिळत असल्याने तिलारी नदी पात्रातील पाण्यातही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Water discharge from Tilari dam has started, vigilance warning to the riverside villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.