पाण्यासाठी ‘जलवर्धिनी’चा हात
By admin | Published: March 20, 2016 09:41 PM2016-03-20T21:41:05+5:302016-03-20T23:53:58+5:30
दुष्काळाचे संकट : कोकणात पावसाचे पाणी साठविण्यासाठी उपक्रम
रत्नागिरी : राज्य शासनातर्फे सुरू असलेल्या जलजागृती सप्ताहाला प्रतिसाद देताना मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानने रत्नागिरीवासीयांसाठी फेरोसिमेंट जलसाठवण टाक्या बांधण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. श्रमदानातून या टाक्या उभारू इच्छिणाऱ्या ग्रामस्थांसाठी बांधकाम साहित्य तसेच तंत्रज्ञानही मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे.
राज्य शासनातर्फे कोकण पाटबंधारे विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यात जलजागृती सप्ताह सुरू झाला आहे. या सप्ताहानिमित्ताने मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानचे विश्वस्त उल्हास परांजपे कोकणात मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले होते. फेरोसिमेंट तंत्रज्ञानाच्या आधारे पावसाचे पाणी साठविण्याच्या पद्धती जलवर्धिनीने विकसित केल्या
आहेत.
कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस पडूनही अनेक भागात उन्हाळ्यात शेतीसाठी आणि पिण्यासाठीही पाणी शिल्लक राहत नाही. पावसाचे पाणी साठविणे हा त्यावरचा उपाय आहे. कमी खर्चात पाणी साठविण्याचे अनेक नमुने जलवर्धिनीने विकसित केले आहेत. रायगड, सिंंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही या नमुन्यांच्या साठवण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्याविषयीची माहिती परांजपे यांनी यावेळी दिली.
शासनाने पाणी साठविण्यासाठी केलेले सहभागाचे आवाहन आणि कोकणवासीयांची गरज लक्षात घेता जलवर्धिनीतर्फे गरजूंना मदतीचा हात देण्याचे परांजपे यांनी जाहीर केले. रत्नागिरी जिल्ह्यात या जलसाठवण टाक्या बांधण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे मदत केली जाणार आहे. गरजू शेतकऱ्यांकरिता जमिनीवरील दहा हजार लीटरपर्यंतची क्षमता असलेल्या साठवण टाक्या यामध्ये बांधण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांनी पाया बांधण्यासाठी बांधकाम साहित्य देऊन श्रमदान केल्यास टाक्यांच्या उभारणीसाठी आवश्यक स्टील, जाळ्या, सिमेंट इत्यादी साहित्य जलवर्धिनीतर्फे दिले जाणार असून, देखरेख ठेवण्याचे कामही प्रतिष्ठानतर्फे केले जाणार आहे. पावसाचे वाया जाणारे पाणी अडवून ठेवल्यास पाणीटंचाईचे प्रमाण काही अंशी दूर करण्यात यश येऊ शकते. त्यामुळे हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. (प्रतिनिधी)
मुबलक पाऊस : जिरवण्याची प्रक्रिया शून्य
कोकणात पावसाचे प्रमाण मुबलक आहे. इतर भागांपेक्षा कोकणात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण खूपच चांगले आहे. मात्र, हे पाणी अडविण्याचे, जिरवण्याचे प्रयत्न होत नसल्याने पाणी वाया जात आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.