पाणी उशाशी...तरीही तहान मात्र घशाशी
By admin | Published: December 13, 2015 12:34 AM2015-12-13T00:34:37+5:302015-12-13T01:12:38+5:30
शासनाच्या उदासिनतेने जमिनी ओसाडच : तिलारी प्रकल्पाचा दोडामार्गसाठी वापर अत्यल्पच
वैभव साळकर ल्ल दोडामार्ग
तिलारी प्रकल्पाचे लाखो घनलिटर पाणी दरदिवशी गोव्याच्या दिमतीला धावत असून ते गोवा राज्यासाठी संजीवनी ठरले आहे. मात्र, दोडामार्ग तालुक्यात या पाण्याचा उपयोग फारच अत्यल्प प्रमाणात होताना दिसत आहे. वास्तविक पाहता हा प्रकल्प तालुक्यात असल्याने येथील शेतकऱ्यांना याचा जास्त फायदा होणे अपेक्षित असताना पाणीवापर संस्था स्थापन करण्यात शासनाची असलेली उदासिनता आणि प्रकल्पाकडून आकारली जाणारी भरमसाठ पाणीपट्टी या कारणांमुळे या पाण्याचा वापर तालुक्याला हवा तेवढा होताना दिसत नाही. त्यामुळे पाणी उशाशी पण तहान घशाशी असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली तर या पाण्याचा शंभर टक्के वापर अल्पावधीतच होईल.
महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त विद्यमाने तिलारी प्रकल्प साकारला आहे. जवळपास दीड हजार कोटी रूपयांचा टप्पा ओलांडून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. प्रकल्पाच्या खर्चात ७६ टक्के वाटा गोव्याचा तर २४ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. साहजीकच तिलारी प्रकल्पाचे पाणी गोव्याला अधिक प्रमाणात देणे क्रमप्राप्त आहे. एकूण १६ टिमसी पाणीसाठा असलेल्या या प्रकल्पाचे पाणी गोव्यात नेण्यासाठी डावा व उजवा असे दोन कालवे खोदण्यात आले आहेत. त्यापैकी मुख्य धरणाचे पाणी डाव्या कालव्याद्वारे गोव्यात डिचोली तालुक्यात सोडले जाते. तर तेरवण-मेढे-उन्नेयी बंधाऱ्याचे पाणी उजव्या कलव्याद्वारे पेडणे तालुक्यात सोडले जाते. डावा कालवा हा तालुक्यातील खानयाळे, साटेली-भेडशी, बोदडे, कुडासे, आंबेली, कसई-दोडामार्ग, या गावातून जातो. तर उजवा कालवा घोटणेवाडी, घोटगे परमे, कुडासे, सासोली येथून जात गोव्यात पेडणे तालुक्यात हणखणे याठिकाणी प्रवेश करतो. साहजिकच ज्या-ज्या गावातून हे दोन्ही कालवे गेले आहेत. त्या-त्या ठिकाणचे क्षेत्र प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येते. मात्र, सासोली, घोटगेवाडी व घोटणे-परमे या चार गावातील काही मोजक्याच ठिकाणी प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग केला जातो.
उर्वरित ठिकाणी प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. उर्वरीत ठिकाणी मात्र तिलारी प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या आजूबाजूच्या अनेक जमिनी पाण्याची उपलब्धता असतानासुद्धा पडीक दिसतात.
अगदी या उलट गोवा राज्याला हेच पाणी वरदान ठरले असून त्याठिकाणी तिलारीच्या पाण्यावरच कृषीक्रांती झाली आहे. डिचोली व पेडणे तालुक्यात प्रकल्पाच्या पाण्याचा उपयोग तेथील शेतकऱ्यांनी उन्हाळी वायंगणी भातशेती करण्यासाठी पुरेपूर केला आहे. काही वर्षापूर्वी ज्या ठिकाणी ओसाड जमिनी होत्या, त्या आता ओलिताखाली आल्या आहेत. त्याव्यतिरिक्त या पाण्याचा उपयोग उद्योगधंद्यासाठी देखील होऊ लागल्याने गोवा राज्यासाठी तिलारी प्रकल्प संजीवनी देणारा ठरला आहे.
गंभीर अवस्था : शेतकऱ्यांना फायदा नाही
४गोव्यात तिलारीच्या पाण्याचा दर तेथील जलसंपदा खात्याने अल्पप्रमाणात आकारला आहे. त्यामुळे या पाण्याचा फायदा उत्पन्न वाढीसाठी झाला आहे. याउलट दोडामार्ग तालुक्यात वेगळे चित्र आहे. पाणीवापर संस्था स्थापन करण्यात शेतकरी पुढे येत नसल्याने आणि प्रकल्पाची पाणीपट्टी चढत्या दराने आकारली जात असल्याने पाण्याचा आवश्यक तेवढा वापर होत नाही. साहजिकच हा प्रकल्प तालुक्यात असूनसुद्धा त्याचा फायदा शेतकरी वर्ग उठवू शकत नाही. त्यामुळे पाणी एकच पण गोव्यात त्याचा दर कमी पण तालुक्यात मात्र महाग अशी गंभीर अवस्था येथे पहावयास मिळते.