जलव्यवस्थापन सभा वादळी
By admin | Published: April 13, 2016 10:54 PM2016-04-13T22:54:26+5:302016-04-13T23:33:43+5:30
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दोषी : वैभववाडीतील विविध कामांवरून खडाजंगी
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आलेल्या कामाचा थेट पंचनामा जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर व सभापती दिलीप रावराणे यांनी केला. धनगरवाड्यांमध्ये पाण्याची व्यवस्था न करणे, वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ येथील नळपाणी पुरवठा योजनेत आर्थिक अपहार झाला असताना संबंधितांवर कारवाई करताना चालढकलपणा करणे, वैभववाडीतील नळपाणी योजनेची कामे एकाच ठेकेदाराला देणे यासह आदी विषयांवर आजची जलव्यवस्थापन समिती सभा चांगलीच वादळी ठरली. याप्रकरणी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दोषी ठरवत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले.
जिल्हा परिषद जलव्यवस्थाप व स्वच्छता समितीची सभा अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, विषय समिती सभापती दिलीप रावराणे, आत्माराम पालेकर, रत्नप्रभा वळंजू, अंकुश जाधव, समिती सदस्य जर्नादन तेली, पंढरीनाथ राऊळ, वासुदेव परब, सुगंधा दळवी, भारती चव्हाण, संजिवनी लुडबे, समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी तसेच अधिकारी खातेप्रमुख उपस्थित होते.
बुधवारी झालेली सभा विविध विषयांवर गाजली. वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ येथील नळपाणी पुरवठा योजनेत आर्थिक अपहार झाल्याचे चौकशी अंती स्पष्ट होऊन सुमारे दीड महिने लोटले तरी, संबंधित ठेकेदार व पाणी पुरवठा अध्यक्षांवर कोणती कारवाई केली, अशी विचारणा सभागृहात करण्यात आली.
या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देताना संबंधितांना मंगळवारी कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आले आहे, असे मराठे यांनी सांगितले. संबंधितांवर कारवाई करण्याचे गेल्या महिन्यात ठरले असतानाही कारवाई करण्यास विलंब का लागला? असा जाब जिल्हा परिषद अध्यक्षांनी मराठेंना विचारले. सात दिवसात याबाबतचा खुलासा मागवा व तो अमान्य असल्यास संबंधितांवर फौजदारी दाखल करा, असे आदेश यावेळी देण्यात आले. यामुळे काहीकाळ वातावरण संतप्त बनले
होते. (प्रतिनिधी)
‘ते’ ७0 लोक : केसरी गावचे नसल्याचा ग्रामपंचायतीचा अहवाल
केसरी गावात तब्बल ७0 लोकसंख्या वस्तीची धनगरवाडी असून याठिकाणी सध्या भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. असे असताना केसरी ग्रामपंचायत मात्र, हे ७0 लोक आमच्या गावचे रहिवासी नसल्याचे सांगत आहेत. अशी माहिती पंढरीनाथ राऊळ यांनी दिली. याची जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी गंभीर दखल घेत त्याठिकाणी तत्काळ बोअरवेल मंजूर केली. गेली कित्येक वर्षे ही लोक त्या गावात राहत असतील आणि संबंधित ग्रामपंचायत त्यांना रहिवासी नसल्याचा अहवाल देत असतील तर ते गंभीर आहे. या प्रकरणी चौकशी करून जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा, असे आदेश संग्राम प्रभूगावकर यांनी दिले.
जाधव यांच्या सूचनांची दखलच नाही
मी चार वर्षे पदाधिकारी म्हणून सातत्याने धनगरवाडीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप त्यावर काहीच उपाय काढता आलेला नाही. माझ्या चार वर्षाच्या कारकिर्दीत अजूनपर्यंत योजना होऊ शकत नाही. माझ्या पाठपुराव्याचा काय उपयोग ? असा प्रश्न अंकुश जाधव यांनी सभागृहात उपस्थित केला. मात्र, यावर कोणीच जास्त खोलात न जाता हा विषय येथेच थांबविण्यात आला.