पाणीप्रश्नी सर्व पक्ष एकवटणार

By admin | Published: October 19, 2015 10:37 PM2015-10-19T22:37:20+5:302015-10-19T22:38:40+5:30

आज बैठक : पाण्याचा थेंब न देण्याचा निर्धार

Water pressure gathered all the parties | पाणीप्रश्नी सर्व पक्ष एकवटणार

पाणीप्रश्नी सर्व पक्ष एकवटणार

Next

नाशिक : गंगापूर धरणात ७० टक्के पाणीसाठा असूनही नाशिककरांनी भविष्याची चिंता वाहत पाणीकपातीचा स्वीकार केला आहे. नाशिककर आतापासूनच पाणीटंचाईला सामोरे जात असताना कोणत्याही परिस्थितीत गंगापूर धरणातील पाण्याचा एक थेंबही बाहेर जाऊ देणार नाही, असा निर्धार शिवसेनेने केला आहे. दरम्यान, उद्भवलेल्या पाणीप्रश्नी सर्व पक्षांच्या शहर व जिल्हा प्रमुखांची बैठक मंगळवारी (दि. २०) महापालिकेत सेना गटनेता कार्यालयात दुपारी ४ वाजता घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने गंगापूर धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १.३६ टीएमसी पाणी वहन मार्गाने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयास विरोध दर्शवित अजय बोरस्ते यांनी सांगितले की, गंगापूर धरणात आजमितीला ७० टक्के पाणीसाठा आहे. नाशिक महापालिकेने भविष्यात कमी होणारा पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि नाशिककरांनीही मोठ्या मनाने पाणीकपातीच्या निर्णयाचा स्वीकार केलेला आहे. परंतु, सरकार नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. शहरात वर्षभर सिंहस्थ कुंभमेळा सुरू राहणार आहे. कुंभमेळ्यातील महत्त्वाच्या तिथींना लाखो भाविक शहरात येत आहेत. त्यासाठीही पाणी आरक्षण आहे. अशा स्थितीत धरणातील पाणी वहन मार्गाने नेऊन वाया जाऊ दिले जाणार नाही. शिवसेना त्याविरोधात आक्रमक भूमिका घेईल. ज्या कुणी अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला त्यांचे डोके ठिकाणावर आहे काय, असा सवालही बोरस्ते यांनी केला. दरम्यान, या पाणीवाटपाबाबत सर्व पक्षांच्या शहर व जिल्हा प्रमुखांची एकत्रित बैठक मंगळवारी बोलाविण्यात आली असून, त्यात आंदोलनाची पुढील रुपरेषा निश्चित केली जाणार असल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.

Web Title: Water pressure gathered all the parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.