जलशुध्दिकरण कचऱ्यात!
By admin | Published: November 13, 2015 09:34 PM2015-11-13T21:34:56+5:302015-11-13T23:39:25+5:30
पाणी शुद्धतेबाबात प्रश्नचिन्ह : साळवी स्टॉपचा कचरा प्रश्न चिघळणार
रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात कचऱ्याच्या ढिगांमध्ये जलशुध्दिकरण प्रक्रिया होत असून, रत्नागिरीकरांना मिळणाऱ्या पाण्याच्या शुध्दतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप परिसरातील या कचऱ्याच्या दुर्गंधीने व ढीग दररोज पेटवून दिले जात असल्याने नागरिकांना जगणे कठीण बनले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास कचरा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी शहरातील दररोज संकलित होणारा कचरा गेल्या काही वर्षांपासून शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात टाकला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कचऱ्याच्या दुर्गंधीचा स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात अनेक रुग्णालये आहेत. तेथे येणाऱ्या रुग्णांनाही या दुर्गंधी व धुराचा फटका बसत आहे. संपूर्ण शहराचा कचरा टाकण्याचे हे ठिकाण बदलावे व अन्यत्र कचरा टाकला जावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक करीत आहेत. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले.
आता या भागाचे प्रतिनिधीत्व करणारे नगरसेवक प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी स्थानिकांचा हा प्रश्न नेटाने लावून धरला आहे. याबाबत त्यांनी नगरपरिषदेच्या सभेतही आवाज उठविला असून, तत्काळ या कचरा डंपिंगची सोय अन्यत्र करावी, अशी मागणी केली आहे. असे झाले नाही तर स्थानिक नागरिकांच्या रोषाला नगरपरिषदेला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
रत्नागिरीची लोकसंख्या ७७ हजारांपेक्षा अधिक असून, रत्नागिरी ही जिल्ह्याची राजधानी असल्याने हजारो लोक रोज शहरात ये-जा करीत असतात. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. दररोज पालिकेच्या कचरा वाहनांमधून २२ ते २४ टन कचरा संकलित केला जातो. हा सर्व कचरा साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारातील मोकळ्या जागेत टाकण्यात येतो. गेल्या काही वर्षात याठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या कचरा समस्येबाबत नगरपरिषदेने मार्ग न काढल्यास येत्या पंधरवड्यात हा प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
दहा वर्षांपूर्वी निर्देश : घनकचरा प्रकल्पाचे भिजत घोंगडे
साळवी स्टॉप येथील कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प नगरपरिषदेने उभारावा, असे निर्देश शासनाकडून दहा वर्षांपूर्वी देण्यात आले आहेत. मात्र, जागा मिळत नसल्याने या प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडले आहे. दांडेआडोमच्या घनकचरा प्रकल्प प्रस्तावालाही जवळपास पूर्णविराम मिळाल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे हा प्रकल्प करावा कुठे, असा गंभीर प्रश्न नगरपरिषद प्रशासनापुढेही उभा ठाकला आहे. याबाबत पालिकेतील नगरसेवक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही हात वर केले असून, ही समस्या सुटणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांची घुसमट
शहरानजीकच्या साळवी स्टॉप येथे टाकण्यात येणारा कचरा सायंकाळच्या वेळेत जाळण्यात येत असल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. सायंकाळी या ठिकाणाहून जाताना नागरिकांची घुसमट होते, तरीदेखील प्रशासन ढिम्म आहे, याचे आश्चर्य आहे.