पाणीटंचाईचे ढग यंदा ‘निरभ्र’च
By admin | Published: March 15, 2017 11:10 PM2017-03-15T23:10:01+5:302017-03-15T23:10:01+5:30
जिल्हा परिषद : २ कोटी ६५ लाखांचा आराखडा
रत्नागिरी : सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि बांधण्यात आलेले बंधारे यामुळे यंदा जिल्ह्यात अद्याप पाणीटंचाई सुरु झालेली नाही. जिल्ह्यात उद्भवणाऱ्या टंचाईला सामोरे जाण्यासाठी २ कोटी ६५ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, यावेळच्या कृती आराखड्यामध्ये विंधन विहिरी आणि नळपाणी योजना दुरुस्तीचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रामीण भागामध्ये डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ त्यामुळे धनगरवस्त्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी कित्येक मैल डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागते़
गतवर्षी लांजा तालुक्यातील पालू - चिंचुर्टी गावातील धावडेवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली होती. ही धावडेवाडी लांजापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर वसलेली आहे. ही माचाळ या अतिउंच डोंगराळ गावाच्या नजीक आहे. त्यामुळे पालू - चिंचुर्टीतील धावडेवाडीमध्ये पहिला टँकर प्रशासनाकडून धावला होता.
यावर्षीचा संभाव्य आराखडा २ कोटी ६५ लाख रुपयांचा आहे. गतवर्षीच्या आराखड्यामध्ये विंधन विहिरींची कामे आणि नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीच्या कामांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. यंदा दोघांचाही समावेश करण्यात आला आहे.
या टंचाईग्रस्तांना सुमारे २५ टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच विंधन विहिरींसाठी ५७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४१ लाख २० हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. हा आराखडा तयार करुन जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्याला मंजूरीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद कृषी विभागाने पाणी आडवा, पाणी जिरवा या तत्त्वावर श्रमदानातून बंधारे उभारण्यास सुरुवात केली होती. यामध्ये वनराई, कच्च बंधारे समावेश आहे. जिल्ह्यात सुमारे ५ हजारांपेक्षा जास्त बंधारे उभारण्यात आल्याने त्याचा फायदा पाणीटंचाई दूर जाण्यासाठी झाला. गतवर्षी १८ मार्चपासून जिल्ह्यात पाणीटंचाई सुरु झाली होती. मात्र, यंदा अजून टंचाई सुरु झालेली नसली तरी काही भागातून टँकरची मागणी करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)