पाणीटंचाईची दाहकता वाढली

By admin | Published: April 7, 2017 10:55 PM2017-04-07T22:55:48+5:302017-04-07T22:55:48+5:30

दापोली तालुका : देवाच्या डोंगरपाठोपाठ अनेक गावांमध्ये येणार पाणीटंचाईचे संकट

Water scarcity increased | पाणीटंचाईची दाहकता वाढली

पाणीटंचाईची दाहकता वाढली

Next



शिवाजी गोरे ल्ल दापोली
दापोली तालुक्यातील देवाचाडोंगर येथील पाणीटंचाईची भीषणता लक्षात घेऊन या गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरु झाला आहे. या गावापाठोपाठ आता तालुक्यातील अन्य गावांमध्येही पाणीटंचाई भीषण रुप धारण करु लागली आहे. तालुक्यातील ९ गावे व ३१ वाड्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. लवकरच या गावांमध्येही पाण्याचा टँकर धावणार आहे. मात्र, पुढील आठवड्यापर्यंत पाणीटंचाईचे संकट अजून भीषण होण्याची शक्यता आहे. मात्र, या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा दावा केला जात आहे.
देवाचाडोंगर येथील धनगर वस्तीला दरवर्षी पाणीटंचाईची झळ बसते. दापोलीच्या तहसीलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, पाणीपुरवठा विभागाचे शेंडे यांनी प्रत्यक्ष पाणीटंचाईची पाहणी करुन देवाचाडोंगर येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याला हिरवा कंदील दाखवला. देवाचाडोंंगर येथे टँकरने पाणीपुरवठा सुरु झाल्यामुळे येथील धनगरवस्तीला थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र, दरवर्षी एप्रिल महिन्याची चाहूल लागताच पाणीटंचाईचे संकट भीषण रुप धारण करते. एप्रिल व मे महिन्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेत प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्याची पूर्ण तयारी केली आहे. परंतु, याचवेळी प्रशासनाकडे टँकरचा तुटवडा आहे. तसेच नादुरुस्त टँकर ही त्यापैकीच एक समस्या आहे. अपुऱ्या टँकरमुळे टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. तहसीलदार टँकर अधिगृहीत करुन ते पाणीपुरवठाकरिता उपलब्ध करुन देतात. देवाचाडोंंगर येथील धनगरवस्तीने टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केल्यानंतर तब्बल २० दिवसांनी तेथे टँकर पोहोचला.
देवाचाडोंगर, जामगे याठिकाणी एक दिवसआड टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील खाडी किनारपट्टीवरील अनेक वाड्याही यावर्षी तहानलेल्या आहेत. या वाड्यांनीसुद्धा टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. परंतु, शासकीय टँकर नादुरुस्त असल्याने टँकर अधिग्रहणाला विलंब होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करताना पंचायत समिती प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.
जामगे, चिखलगाव, अडखळ, मुरुड, ओणनवसे, उसगाव, उंबरशेत, पंचनदी, करजगाव या गावांमधील देवाचाडोंंगर, किन्हळ, वाघवे, बोवणेवाडी, भैरीचाकोंड, तांबडीचा कोंड, शिपवाडी, भंडारवाडा, नवानगर, पश्चिमवाडी, पूर्ववाडी, भोईवाडा, सुतारवाडी, बौद्धवाडी, रामाणेवाडी, मधलीवाडी, धोपटवाडी, गणेशवाडी, बौद्धवाडी, नबीमोहल्ला, नवानगर, संभाजीनगर, चिंचवळवाडी, डायरा, बौद्धवाडी, कोळीवाडा, भाटवाडी, गावठाणवाडी, तिवरे - राहटेवाडी, निंगावळेवाडी, झगडेवाडी, मुकादमवाडी, कोळीवाडा या ३१ वाड्यांमध्ये पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले आहे.
दापोली तालुक्यातील ९ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली असून, यापुढील काळात पाणीटंचाई अजून भीषण होणार आहे. टंचाईग्रस्त गावांमधून टँकरची मागणी करण्यात आली असून या गावांची तहान भागवण्यासाठी अजून दोन ते तीन टँकरची गरज आहे. टंचाईग्रस्त गावे ही एकमेकांपासून दूरवर तसेच विरुद्ध दिशेला असल्याने टँकरच्या संख्येत वाढ करणे आवश्यक आहे. परंतु, टँकर किती उपलब्ध होतात यावर बरंच काही अवलंबून आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी दापोली तालुक्यात पाणीटंचाई थोडी उशिराने सुरु झाली आहे. पुढील काळात ही पाणीटंचाई अधिक तीव्र होणार असल्याने यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Web Title: Water scarcity increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.