कसई-गावठाणवाडीत पाणीटंचाई

By admin | Published: April 29, 2016 09:39 PM2016-04-29T21:39:28+5:302016-04-30T00:56:08+5:30

दोन योजना तरीही वानवा : केवळ पाच मिनिटेच पाणी, प्रशासनावर नाराजी; ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

Water shortage in Kasai-Gaothanwadi | कसई-गावठाणवाडीत पाणीटंचाई

कसई-गावठाणवाडीत पाणीटंचाई

Next

कसई दोडामार्ग : कसई-गावठाणवाडीत तीव्र पाणीटंचाई आहे. जुन्या नळयोजनेतील पाणीसाठा संपत आला आहे. काही नळधारकांना दिवसाला केवळ पाच मिनिटे पाणी मिळत आहे. गावासाठी राबविलेल्या जलस्वराज्य योजनेची नळयोजना कार्यान्वित करून पाणीपुरवठा ५ मे पर्यंत सुरळीत करावा; अन्यथा ६ मे रोजी पाण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
या पत्रकात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, कसई येथे दोन नळयोजना आहेत. सध्या कार्यरत असलेल्या जुन्या नळयोजनेतील पाणीसाठा संपत आला आहे. दिवसातून फ क्त एकदाच साधारणपणे १० ते १५ मिनिटेच पाणी येते. त्यापैकी काही नळधारकांना फक्त पाचच मिनिटे पाणी येते. कसई गावठाणवाडी येथील बहुतांश लोक शेती आणि दुधाचा व्यवसाय करतात. अपुऱ्या पाण्यामुळे लोकांची आणि जनावरांची फारच गैरसोय होत आहे. याकडे कसई दोडामार्ग नगरपंचायतचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष संतोष नानचे यांचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे. उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन ५ मे पर्यंत जलस्वराज्य योजनेची नळयोजना कार्यान्वित करून या वाडीतील ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा ६ मे रोजी कसई दोडामार्ग नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढला जाईल, असा इशारा गावठाणवाडी येथील ग्रामस्थ महादेव राजाराम गवस, विनायक फोंडू गवस, मोहन वासुदेव गवस, श्रीपाद वासुदेव गवस, मनोज नारायण गवस, अनिल बाबी पालकर, अनंत गणपत लब्दे, संदीप ह. गवस, तुळशीदास यशवंत पालकर, वासुदेव श्रीपाद गवस, नारायण वासुदेव गवस, राजाराम महादेव गवस, हरिश्चंद्र ल. गवस, आदी ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)

उदासीनतेबाबत प्रश्नचिन्ह
कसई-गावठाणवाडीत जलस्वराज्य योजनेतील दुसरी विहीर आहे. मात्र, सध्या ती बंद आहे. याबाबत वेळोवेळी ग्रामस्थांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना तोंडी सूचना दिल्या. मात्र, याचा संबंधितांनी गांभीर्याने विचार केला नाही. केवळ ग्रामस्थांची चेष्टा करण्याचे काम नगरपंचायतीने केले. जलस्वराज्य योजनेच्या विहिरीचे पाणी सुरू केले, तर गावठाणवासीयांची पाण्याची गरज खात्रीने पूर्ण होऊ शकते. परंतु, याबाबत कल्पना देऊनही संबंधितांकडून उदासीनता दाखविली जात असून, याचे नेमके कारण समजत नाही.

Web Title: Water shortage in Kasai-Gaothanwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.