वाभवेतील पाण्याची टाकी कोसळली, वैभववाडी नगरपंचायतीचे वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 01:34 PM2019-06-24T13:34:28+5:302019-06-24T13:36:46+5:30
वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने वाभवे तांबेवाडी येथे अडीच लाख रुपये खर्चून महिनाभरापूर्वी बांधलेली टाकी कोसळली आहे. पहिल्याच पावसात टाकी कोसळल्यामुळे बांधकामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असूून याबाबत जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी उपसरपंच गुलाबराव चव्हाण यांनी ठेकेदाराला बिल अदा केल्यास ते वसूल करावे, अशा मागणीचे मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीने वाभवे तांबेवाडी येथे अडीच लाख रुपये खर्चून महिनाभरापूर्वी बांधलेली टाकी कोसळली आहे. पहिल्याच पावसात टाकी कोसळल्यामुळे बांधकामांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असूून याबाबत जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी उपसरपंच गुलाबराव चव्हाण यांनी ठेकेदाराला बिल अदा केल्यास ते वसूल करावे, अशा मागणीचे मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.
वाभवे तांबेवाडी येथे लघु नळपाणी योजना आहे. या योजनेकरीता कठडा बांधून त्यावर टाकी बसविणे या कामांकरीता अडीच लाख रुपये मंजूर होते. हे काम महिनाभरापूर्वी नगरपंचायतीने ठेकेदाराकडून पूर्ण करून घेतले.
दरम्यान, टाकी ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला कठडा गुरुवार २१ जून रोजी रात्री कोसळला. कठड्यावर ठेवण्यात आलेली पाच हजार लिटरची टाकीदेखील कोसळली असून टाकीचे तुकडे तुकडे झाले आहे. त्यामुळे येथील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार आहे.
दरम्यान या संदर्भात जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी उपसरपंच गुलाबराव चव्हाण यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिेलेल्या निवेदनात या कामांच्या दर्जाबाबत संशय व्यक्त केला आहे. या कामांचे बिल ठेकेदारास दिले असल्यास ते त्यांच्याकडून वसूल करावे किंवा बिल दिले नसल्यास ते अदा करू नये अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.