‘जलयुक्त शिवार’ने पाणीटंचाईवर मात

By Admin | Published: August 30, 2015 10:52 PM2015-08-30T22:52:31+5:302015-08-30T22:52:31+5:30

मंडणगड तालुका : पाच गावांची निवड

Water tanker defeats water shortage | ‘जलयुक्त शिवार’ने पाणीटंचाईवर मात

‘जलयुक्त शिवार’ने पाणीटंचाईवर मात

googlenewsNext

शिवाजी गोरे-दापोली  कायम पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या मंडणगड तालुक्यातील पाच गावांची जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे गावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर होण्यास मदत होईल, तसे झाल्यास तालुक्यातील या पाच गावांतील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरण्यास वेळ लागणार नाही.
मंडणगड तालुका रत्नागिरी जिल्ह्यातील अतिशय दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील वाडी-वस्त्यांत मोठी पाणीटंचाई असते. उन्हाळ्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य हीच या गावाची मोठी समस्या आहे. परंतु शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाट, टाकवली, लोकरवण, वेसवी, साखरी या टंचाईग्रस्त गावांची निवड झाली आहे. पाचही गावात पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचा प्रयत्न होऊन शेततळी, माती नालाबांध, घळीबांध, सिमेंट नाला बांध ही कामे सुरु असल्याने जलयुक्त शिवार अभियानाद्वारे पाणीटंचाईवर मात करण्यात आली.
नैसर्गिक बदलामुळे गेली काही वर्षे राज्यातील जनतेला दुष्काळसदृश परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शिवसेना - भाजप महायुतीच्या सरकारने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. या मोहिमेच्या पहिल्याच वर्षी राज्यातील ६ हजार दुष्काळी गावांची निवड करण्यात आली आहे.
पाच वर्षात २५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. गेल्या दोन दशकांपासून राज्यातील विविध भागात दुष्काळाचे सावट कायम आहे. याला कोकणसुद्धा अपवाद नाही.
कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला तरीही पडलेल्या पावसाचे पाणी थेट समुद्राला जाऊन मिळत असल्याने सर्वाधिक पाऊस पडूनसुद्धा कोकणातील अनेक गावे टंचाईग्रस्त आहेत. पडणाऱ्या पावसाचे ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या पद्धतीने जलयुक्त शिवार अभियान मोहीम राबवण्यात येत असल्याने या मोहिमेत सहभागी झालेल्या गावात मोठ्या प्रमाणावर बदल व्हायला लागले आहेत.
योजनेत निवड झालेल्या गावात सलग समतल चर, खोल सलग समतल चर, माती नालाबांध, साखळी सिमेंट नाला बांध, सिमेंट नाला बांध दुरुस्ती, पाझर तलाव दुरुस्ती, गाव तलाव, नाला सरळीकरण, खोलीकरण, गाळ काढणे, शेततळे, ओढाजोड प्रकल्प आदी कामे सुरु आहेत.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोहिमेच्या पहिल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ गावांची निवड झाली आहे. गावात मोठ्या प्रमाणात कामे सुरु असून, या अभियानामुळे गावातील शिवारात मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धी झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानने ही गावे टंचाईमुक्तीच्या मार्गावर आहेत. या गावातील कायमची पाणीटंचाई दूर होणार आहे.
मंडणगड तालुक्यातील पाट, टाकवली, लोकरवण या तीन गावात माती नालाबांध, शेततळी बांधण्यात आल्याने या गावातील पाणी साठवणुकीत वाढ होऊन भूजल पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे.
गावातील शिवारात बंधारे बांधण्यात आल्याने बंधारे व शेततळ्यातील पाण्याने शिवार जलयुक्त दिसू लागले आहे. शिवारातील पाणी उपलब्धतेमुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच शेततळी व माती नाला बांधमधील पाणी बारमाही असणार आहे. त्यामुळे विहिरीच्या पाणी पातळीतही वाढ होऊन पाणीटंचाई कायमची दूर होणार आहे.

जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. अभियानात पहिल्या वर्षी मंडणगड तालुक्यातील एकूण पाच गावे टंचाईमुक्त झाली आहेत. या अभियानामुळे दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न आहे.
- संदीप कांबळे,
तालुका कृषी अधिकारी, मंडणगड

जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सुरु आहे. शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होणार आहे. दापोली, खेड, मंडणगड या तीन तालुक्यांतील १५ गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यात शासनाला यश आले आहे.
- जे. एस. घोडके,
विभागीय कृषी अधिकारी, दापोली.

Web Title: Water tanker defeats water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.