पाणी तुंबल्याने खारेपाटण येथील आवेरा पुलाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:27 PM2019-07-01T13:27:31+5:302019-07-01T13:29:19+5:30
खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथील आवेराचा पूल येथे सध्या महामार्ग प्राधिकरणच्यावतीने मोठ्या प्रमाणात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ...
खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथील आवेराचा पूल येथे सध्या महामार्ग प्राधिकरणच्यावतीने मोठ्या प्रमाणात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या पुलाच्या शेजारी नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाची संरक्षक भिंत व पिलरचे काम अर्धवट स्थितीत आहे.
हे काम करीत असताना उत्खनन केलेली माती व दगड जुन्या आवेराच्या पुलाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या पाणी जाण्याच्या मार्गावर टाकल्याने पाणी जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे गेले दोन दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलालासुद्धा धोका निर्माण झाला आहे.
खारेपाटण येथे मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. खारेपाटण आवेराचा पूल येथील भागात मोठ्या प्रमाणात कातळ म्हणजेच काळा दगड सापडल्यामुळे महामार्ग ठेकेदाराने आपला बराच वेळ येथे मिळालेला खनिजसाठा उत्खनन करण्यात घालविला. जेवढा काळा दगड मिळेल, तेवढी खोदाई करण्याचा जणू सपाटाच चालविला होता.
परिणामी शनिवारी येथे खोलगट भाग तयार झाला असून, काही ठिकाणी महामार्गाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर सध्या असलेल्या महामार्गाच्या उंचीपेक्षा बऱ्यांचअंशी कमी उंचीने आताच्या महामार्गाचे काम खाली उतरविण्यात आले आहे. या पुलावर आजपर्यंत अनेक अपघात झालेले आहेत व होतदेखील आहेत. मात्र, सध्या जे येथे महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने काम सुरू आहे, त्याचा फटका येथील जुन्या असलेल्या आवेराच्या पुलाला बसण्याची दाट शक्यता आहे.
ठेकदाराने नवीन आवेराच्या पुलाचे बांधकाम करीत असताना पिलर खोदाई करून काढलेली माती व दगड हे बाजूला न काढता जुन्या आवेराच्या पुलाच्या खालील भागातच रचून ठेवल्यामुळे संपूर्ण पावसाचे पाणी तेथे तुंबले आहे. परिणामी पूरस्थिती निर्माण होऊन सर्वत्र पाणी तुडुंब भरले असल्याने या मार्गावरून वाहतूक करणे जिकिरीचे बनले आहे.
पाण्याचा मार्ग मोकळा करावा
खारेपाटण आवेराचा पूल येथे पाणी तुडुंब भरून राहिले आहे. मुसळधार पाऊस असाच कायम राहिल्यास आवेराच्या पुलाच्या वरच्या बाजूला साठलेले पाणी कधी आवेराच्या पुलाच्या वर येईल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग बंद व्हायला वेळ लागणार नाही. संबंधित महामार्ग ठेकेदाराने याकडे त्वरित लक्ष देऊन बंद झालेल्या पाण्याचा मार्ग
मोकळा करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.