किनारपट्टीवर पाणीटंचाईचे चटके

By admin | Published: May 1, 2016 12:19 AM2016-05-01T00:19:41+5:302016-05-01T00:19:41+5:30

पाणी विकत घेण्याची नामुष्की : तळाशीलवासीय 'घागर मोर्चा'च्या पवित्र्यात

Water turbulence shore at the coast | किनारपट्टीवर पाणीटंचाईचे चटके

किनारपट्टीवर पाणीटंचाईचे चटके

Next

सिद्धेश आचरेकर ल्ल मालवण
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर यंदाच्या वर्षी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दुष्काळजन्य परिस्थिती एवढी नसली तरी किनारपट्टी भागातील ग्रामस्थांच्यात मात्र कोरड पडायला लावणारी आहे. गतवर्षी पाऊस कमी पडल्याने भूजल पातळीत घट झाल्याने मार्चपासून पाणीटंचाईचे चटके सहन करायची नामुष्की किनारपट्टीवासीयांवर ओढवली आहे.
मालवण तालुक्यातील तळाशीलसह सर्जेकोट, देवबाग गावातील विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत आहे. गोड्या पाण्याच्या विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत असल्याने आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. मे महिन्यात खारट पाण्याची तीव्रता अधिक वाढणार असून यातून त्वचारोगासारखे आजार होण्याचीही शक्यता ग्रामस्थ वर्तवत आहेत. तालुक्यातील तळाशीलसह सर्जेकोट आणि देवबाग संगम या भागात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. तर जिल्हा प्रशासनाकडून येत्या आठ दिवसात तळाशील गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून न दिल्यास तळाशीलवासीय तहसील कार्यालयावर ‘घागर मोर्चा’ काढण्याच्या तयारीत आहे. जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांची समस्या ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी ग्रामस्थ करत आहे.
दरम्यान, तोंडवली-तळाशील येथील खारट पाणीप्रश्नी आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेत टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची होत असलेली हेळसांड थांबबावी यादृष्टीने प्रशासनाकडून तत्काळ कार्यवाही करण्यात येणे आवश्यक आहे. कारण सर्जेकोट येथील नागरिकांना दरदिवशी २०० प्रमाणे पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच तळाशील येथील पर्यटन व्यावसायिकांनाही पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढवली आहे.
सुमार पावसाचा किनारपट्टीला फटका
गतवर्षी सरासरीपेक्षा सुमार पाऊस पडल्याने याचा सर्वाधिक फटका किनारपट्टी भागाला बसला आहे. किनारपट्टी भागातील विहिरीत भूजल पातळी घटली आहे. त्यात पाण्याचाही वापर वाढल्याने पाण्याची सरासरी पातळी घटली. त्यामुळे समुद्रातील खारट पाण्याचे स्त्रोत गोड्या पाण्यात मिश्रित होऊन पाण्याचे पाणी क्षारयुक्त बनले आहे. विहिरींच्या पाण्यात क्षारतेचे प्रमाण वाढल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्वचारोगासारखेही गंभीर आजार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पावासाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे काळाची गरज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे. तळाशीलप्रमाणे देवबाग मोबार-संगम येथीलही विहिरीत क्षारयुक्त पाणी मिळत असल्याने त्यांना पाण्यासाठी दोन किमीची पायपीट करावी लागत आहे. वायरी, तारकर्लीसह दांडी किनारी तेवढे क्षारयुक्त पाणी मिळत नसल्याचे मच्छिमारांनी सांगितले.
घागर मोर्चा काढणार
तळाशील गावात खारट पाण्याने विहिरींवर राज्य केले असल्याने पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. दरवर्षी मे अखेरीस येथील विहिरीत क्षारयुक्त पाणी मिसळून खारट पाणी तयार होते. मात्र, गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने भूजल पातळी घटली. त्यामुळे गोड्या पाण्यात खारट पाणी मिश्रित व्हायला सुरुवात झाले. दरवर्षी मे अखेरीस मिश्रित होणारे हे पाणी यंदा मात्र फेब्रुवारीपासून सुरु झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहिली आहे. क्षारयुक्त पाणीप्रश्नी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास आठवडाभरात तळाशील येथील सर्व ग्रामस्थ तहसील कार्यालयावर ‘घागर मोर्चा’ काढणार असल्याचा इशारा ग्रामस्थांच्यावतीने सरपंच संजय केळुसकर यांनी ‘लोकमत'शी बोलताना दिला आहे.

Web Title: Water turbulence shore at the coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.