निधी नसल्याने पळाले तोंडचे पाणी
By admin | Published: March 11, 2017 09:16 PM2017-03-11T21:16:44+5:302017-03-11T21:16:44+5:30
राष्ट्रीय पेयजल योजना : १६७ कामे अपूर्ण
शोभना कांबळे-- रत्नागिरी --चालू आथिक वर्षात राष्ट्रीय पेयजल योजनेचा रत्नागिरी जिल्ह्यासाठीचा २० कोटींचा निधी केंद्राकडून न आल्याने राज्याचा १६.२० कोटींचा निधी वापराविना पडून आहे. राज्याचा निधी येऊनही तो खर्च करण्यासंदर्भात कुठलेच मार्गदर्शन न मिळाल्याने या योजनेची जिल्ह््यातील १६७ कामेही अपूर्ण आहेत. त्यामुळे आता राज्याचा निधी खर्च करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
काही योजना या केंद्र सरकारकडून राबविल्या जातात. त्यात काही टक्के निधी राज्य सरकारकडून जोडला जातो. राष्ट्रीय पेयजल योजनेसाठीही केंद्र सरकारकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी २० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. त्याला जोड निधी म्हणून राज्य सरकारकडून १६.२० कोटी रूपये मंजूर झाले आहेत. राज्याचा हा निधी जिल्हा प्रशासनाकडे याआधीच आला आहे. मात्र, केंद्राकडून अद्यापही निधी आलेला नाही.
हा निधी न आल्याने राज्याचा निधी खर्च करण्याकरिताही कुठलेच मार्गदर्शन जिल्हा प्रशासनाकडे आलेले नाही. आता आर्थिक वर्षाचा अखेरचा महिना सुरू झाला तरी केंद्राचा वाटा अद्याप जिल्हा नियोजन समितीकडे आलेला नाही. त्यामुळे या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पेयजल योजनेची अनेक कामे ठप्प झाली आहेत. राज्याचा १६.२० कोटींचा निधीही तसाच पडून आहे.
राज्य शासनाकडून या योजनांसाठी आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र, त्यातील केंद्र सरकारचा वाटा अजूनही उपलब्ध झालेला नाही. या योजना कशा राबवाव्यात किंवा आहे तो निधी कसा वापरावा, याबाबत मार्गदर्शनही न आल्याने योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांची कुचंबणा झाली आहे. निधीअभावी राष्ट्रीय पेयजल योजना अडकून पडल्या आहेत.
गतवर्षीच्या शिल्लक निधीतून थोडीफार कामे झाली. पण आता आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी केंद्राचा निधी आला नाही तर नवीन कामांचे काय, हा प्रश्नच आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामांसाठी केंद्राकडून यावर्षीसाठी अद्याप निधीच आलेला नाही. त्यामुळे राज्याचाही १६.२० कोटींचा निधीही आता वर्षभर वापराविना पडून राहणार आहे. यामुळे जिल्ह््यातील १६७ कामे अपूर्ण राहिली आहेत. त्यामुळे या निधीचा विनीयोग करण्याची परवानगी मिळावी, असे साकडे आता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे घातले आहे. आता यावर शासनाच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
चित्र बदलले : निधी मिळण्यास विलंब नाही
केंद्र आणि राज्याच्या संयुक्त योजना वर्षानुवर्षे राबवल्या जात आहेत. केंद्राकडून त्यांचा वाटा उपलब्ध होतो. मात्र, राज्य सरकारकडून अपेक्षित असलेला निधी मिळण्यास विलंब होतो, अशी स्थिती यापूर्वी अनेकदा समोर आली आहे. यावेळी मात्र हे चित्र बदलले आहे. राज्य सरकारचा वाटा असलेली रक्कम उपलब्ध झाली असली, तरी केंद्र शासनाकडून अजूनही निधी मिळालेला नाही.
राज्याचा निधी खर्च करण्याची परवानगी मिळावी; जिल्हा प्रशासनाची राज्य शासनाकडे मागणी.
राज्याचाही १६.२० कोटींचा निधीही आता वर्षभर वापराविना पडून राहणार.
केंद्र सरकारचा वाटा अजूनही उपलब्ध नाही.
आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी केंद्राचा निधी आला नाही तर नवीन कामांचे काय?
नवीन प्रश्न उभा.
होळीचा होम पेटला... : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथील श्रीदेवी तळेकरीणचा शिमगोत्सव साजरा करण्यात आला. या शिमगोत्सवानिमित्त होम पेटविण्यात आला. या होमात नारळ अर्पण करण्यासाठी नवदाम्पत्यांची गर्दी झाली होती.