पावसाळी सहलीचा बेत आहे? मग देवगडमधील 'हा' धबधबा पहाच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2018 03:38 PM2018-06-14T15:38:29+5:302018-06-14T15:39:11+5:30
सध्या देवगडमधील एक धबधबा सर्व पर्यटकांचा आकर्षणाचा विषय ठरतो आहे.
सिंधुदुर्ग- पावसाळी सहलीचा बेत सध्या प्रत्येक जण आखत असेल. सध्या देवगडमधील एक धबधबा सर्व पर्यटकांचा आकर्षणाचा विषय ठरतो आहे. देवगड तालुक्यापासून अवघ्या १२ किलोमीटरवर असलेल्या तळवडे-न्हावनकोंड धबधब्याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. तळेबाजार-तळवडे येथील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला न्हावनकोंडचा धबधबा गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मान्सूनच्या पहिल्याच पावसाने प्रवाहीत झाला असून अनेक पर्यटक आनंद लुटण्यासाठी या धबधब्याकडे वळत आहेत.
अल्पावधीतच परिचित होऊन हजारो वर्षा पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या न्हावनकोंड धबधब्याची एक ओळख निर्माण झाली आहे. या धबधब्याच्या सुशोभिकरणाचे काम देवगड पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद देसाई यांच्या प्रयत्नाने कोकण पर्यटन विकास निधीतून करण्यात आले आहे.
तेव्हापासून या धबधब्याकडे हजारो पर्यटक व देवगड तालुक्यातील स्थानिक जनताही भेट देऊ लागली आहे. मृग नक्षत्राच्या धुवाँधार पावसाने सुरुवात केल्यानेच हा धबधबा प्रवाहीत होताच अनेक पर्यटक या धबधब्याकडे आनंद लुटण्यासाठी येऊ लागले आहेत.
तसेच मणचे येथील व्याघ्रेश्वर धबधबाही पावसाच्या पाण्याने प्रवाहीत झाल्याने या ठिकाणी पर्यटक दाखल होत आहेत. मे महिन्यामध्ये मुंबईकर चाकरमान्यांनी व पर्यटकांनी देवगड तालुका गजबजून गेला होता. अनेक बीचवरती पर्यटक मे महिन्याच्या सुटीत येत होते. आता पावसाळ्यातही येथील धबधबे प्रवाहीत झाल्याने पर्यटक देवगडात दाखल होऊ लागले आहेत.
देवगड तालुका ठरतोय पर्यटनाचा हब
जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याची देवगडच्या भूमीत जाऊन खरेदी करण्याचा पर्यटकांना एक वेगळाच आनंद मिळत होता. तसेच त्यांना देवगड हापूस हा अस्सल हापूस मिळत होता.
मे महिन्यातील पर्यटकांचा ओघ महिन्याच्या अखेरीस कमी होत असतानाच जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात देवगड तालुक्यामध्ये पाऊस दाखल झाल्याने देवगडमधील प्रसिध्द असलेले मणचे येथील व्याघे्रश्वर धबधबा व तळेबाजार-तळवडे येथील न्हावनकोंड धबधबा प्रवाहीत झाल्याने आता वर्षा पर्यटकही देवगडमध्ये येऊ लागले आहेत.
निसर्ग सौंदर्याने सजलेला देवगड तालुका असून या तालुक्यामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. देवगड बीच, कुणकेश्वर येथील कुणकेश्वर मंदिर, देवगड येथील वॅक्स म्युझियम, विजयदुर्ग किल्ला, वाडा येथील विमलेश्वर मंदिर, गिर्ये रामेश्वर येथील रामेश्वर मंदिर व धबधबे असल्याने तालुक्यामध्ये वर्षाच्या बारमाही हंगामामध्ये पर्यटक येत असल्याचे यावरुन दिसून येत आहेत.