पाणलोटचे कर्मचारी अद्याप वाऱ्यावरच
By admin | Published: November 26, 2015 09:16 PM2015-11-26T21:16:55+5:302015-11-27T00:14:02+5:30
प्रश्न जैसे थे : देवरूख तहसीलदारांना निवेदन सादर
सचिन मोहिते -- देवरुख--एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तालुका कृषी कार्यालय, संगमेश्वर (देवरुख) येथे कार्यरत असणाऱ्या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. तालुका कृषी कार्यालयाने त्यांना सध्या वाऱ्यावरच सोडल्याने स्थानिकांमधून त्याचे पडसाद उमटत आहेत. गेल्या महिन्यापासून आपली व्यथा मांडणाऱ्या त्या आठ कर्मचाऱ्यांनी गुरुवारी देवरुख तहसीलदारांना याबाबत निवेदन देऊन आपल्याला न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला आहे.एकात्मिक पाणलोट विकास व्यवस्थापन कार्यक्रमामध्ये प्रकल्प स्तरावर तीन प्रकारच्या पाणलोट विकास पथक सदस्यांच्या सेवा कंत्राटी स्वरुपात आवश्यकतेनुसार घेण्याची तरतूद केंद्र शासनाने सामायिक मार्गदर्शक सूचना २००८ (सुधारित २०११) नुसार केली आहे. यानुसार हे स्थानिक आठ कर्मचारी कृषितज्ज्ञ, समूह संघटक, उपजीविकातज्ज्ञ अशा पदांवर कार्यरत होते. त्यांनी पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा दिली आहे. त्यांची नियुक्ती ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत करण्यात आली होती. मात्र, प्रकल्पाच्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना पुन्हा सामावून घेण्याचेही निर्देश त्या परिपत्रकात (शासन निर्णयात) असताना संगमेश्वर तालुका कृषी अधिकारी त्या आठ स्थानिक कामगारांना हेतुपुरस्सर डावलण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.जिल्हाभरात अन्य तालुक्यांतून प्रकल्प पूर्ण झालेले नसल्याने अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीही परीक्षा, मुलाखत अशी कोणतीही विनंजीअर्ज न घेता पुन्हा सामावून घेण्यात आले आहे. मात्र, संगमेश्वर तालुक्यातच या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून का घेण्यात येत नाही, असा सवाल या आठजणांनी उपस्थित केला आहे. आपल्यावर अन्याय होत असल्याने त्या आठही कर्मचाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते, सामाजिक संस्था आणि आमदारांपर्यंत आपली कैफियत मांडली आहे.
यावेळीच त्यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी वेळोवेळी जाण्याचा प्रयत्न केला होता. तब्बल तीन-चारवेळा या अधिकाऱ्यांनी अन्य ठिकाणी काम काढून त्यांना सामोरे जाण्याचे टाळल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि लोकमतच्या वृत्तामुळे त्यांची दखल वरिष्ठ कार्यालयाने घेतली होती. मात्र, संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येकाचे वैयक्तिक विनंती अर्ज मागवले होते. मात्र, यावर या आठजणांनी विनंती अर्जाची गरजच काय, असा सवाल करत नियमाप्रमाणे आम्हाला पुन्हा सामावून घ्या, असे स्पष्ट केले आहे.
मात्र, या साऱ्या पार्श्वभूमीवर त्या आठ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अजूनही तालुका कृषी कार्यालय ठोस भूमिका घेत नसल्याने या कर्मचाऱ्यांनी अखेर गुरुवारी देवरुख तहसीलदारांना निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे की, वरिष्ठ कार्यालयाचा आदेश असतानाही आम्हाला पुन्हा सेवेत घेत नसल्याने या अन्यायाविरोधात आपण तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ. याबाबत तहसीलदार वैशाली माने यांनी सांगितले की, येत्या दोन दिवसात तुमचा प्रश्न मार्गी लावू, अशी खात्री दिली आहे.
मनमानी : तीव्र आंदोलनाचा इशारा
अनेक दिवसांपासून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध प्रश्नांबाबत आवाज उठवला, याबाबत आंदोलनेही करण्यात आली. मात्र त्याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने या कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. आता याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
आमदारांचे दुर्लक्ष
स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि आमदारांपर्यंतही हा विषय नेण्यात आला. तरीही हा प्रश्न सुटलेला नाही.