वॉटरस्पोर्ट्सला दोन ते तीन दिवसांत मंजुरी; अस्लम शेख यांची नारायण राणेंना ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 04:46 PM2020-12-15T16:46:17+5:302020-12-15T16:47:10+5:30
Narayan Rane : सोमवारी रात्री उशिरा नारायण राणे यांनी याच विषयावर राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांच्याशी देखील दूरध्वनी वरून चर्चा करून या विषयावर तोडगा काढण्याची मागणी केली.
मालवण : कोकण किनारपट्टीवरील वॉटरस्पोर्ट्सला लवकरच मंजुरी दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांना दिली आहे. किनारपट्टीवरील वॉटरस्पोर्ट्स पूर्ववत सुरू करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्याशी संपर्क केल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा नारायण राणे यांनी अस्लम शेख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत वॉटरस्पोर्ट्स तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती .
कोकणातील वॉटरस्पोर्ट्सला बंदर विभागाने परवानगी नाकारल्याने येथील व्यवसायिकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मात्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या प्रश्नांची दखल घेण्यात येत नसल्याने शनिवारी नारायण राणे यांनी स्वतः याची दखल घेत राज्याचे मुख्य आयुक्त संजय कुमार आणि मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून वॉटरस्पोर्ट्सला तात्काळ परवानगी देऊन एसओपी जाहीर करण्याची सूचना केली होती.
दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा नारायण राणे यांनी याच विषयावर राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदर विकासमंत्री अस्लम शेख यांच्याशी देखील दूरध्वनी वरून चर्चा करून या विषयावर तोडगा काढण्याची मागणी केली. या मागणीला अस्लम शेख यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत येत्या दोन ते तीन दिवसांत ही परवानगी देण्याची ग्वाही दिली आहे .