संदेश पारकर ‘भाजप’च्या वाटेवर

By admin | Published: October 5, 2016 12:25 AM2016-10-05T00:25:12+5:302016-10-05T00:37:33+5:30

गुरुवारी मुंबईत प्रवेश करणार : जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी

On the way to crossing the message of 'BJP' | संदेश पारकर ‘भाजप’च्या वाटेवर

संदेश पारकर ‘भाजप’च्या वाटेवर

Next

कणकवली : कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर राजकारणातील नवीन ‘इनिंग’ची सुरुवात करण्याच्या तयारीत असून, गुरुवारी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ते ‘भाजप’मध्ये प्रवेश करणार आहेत. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटी घेतल्या असून, सध्या ते मुंबई येथे गेले आहेत. पारकरांबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांनीही पक्ष प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात या पक्ष प्रवेशाबाबत सध्या चर्चा रंगली आहे.
महाविद्यालयीन जीवनापासून समाजकारणाबरोबरच राजकारणात संदेश पारकर यांनी रस घ्यायला सुरुवात केली होती. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करताना युवा नेता म्हणून समाजमनावर छाप पाडण्यास त्यांना यश आले आहे. कणकवली ग्रामपंचायतीत सरपंच, तसेच नव्याने झालेल्या नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. राजकीय पक्षातील विविध पदांवरही त्यांनी काम केले आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर पारकर यांनी या पक्षाची कास धरली होती. मात्र, काही कालावधीनंतर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या दीपक केसरकर यांच्याबरोबर त्यांचे अनेकवेळा मतभेद झाले होते. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्यावर अन्याय होत असल्याच्या भावनेतून पारकर यांनी मग काँग्रेसमध्ये प्रवेश करीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची साथ धरली होती. त्यामुळे कोकण सिंचन महामंडळाच्या उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या कालावधीतच त्यांना हे पद मिळाल्याने आचारसंहितेमुळे काम करताना त्यांच्यावर अनेक मर्यादा पडल्या होत्या. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्याने ते काँग्रेसमध्ये असूनही म्हणावे तसे राजकारणात सक्रीय नव्हते.
त्यामुळे ते काँग्रेस सोडून शिवसेनेत किंवा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, या दोन्हीपैकी नेमक्या कुठल्या पक्षात ते प्रवेश करणार, हे मात्र निश्चित झाले नव्हते. आता भाजपमध्ये प्रवेश करण्याचे त्यांनी निश्चित केले असल्याची चर्चा कणकवली शहरासह जिल्ह्यात सुरू आहे. ६ आॅक्टोबरला ते मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. (प्रतिनिधी)+


संदेश पारकरांचा दुजोरा !
राजकारणात प्रामाणिकपणे काम करीत असताना माझ्याबरोबरच सहकारी कार्यकर्त्यांवर वेळोवेळी अन्यायच होत आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘भाजप’सारख्या राष्ट्रीय पक्षात आपण प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत संदेश पारकर यांनी पक्ष प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा दिला.

Web Title: On the way to crossing the message of 'BJP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.