हनुमंतगड नष्ट होण्याच्या मार्गावर

By admin | Published: May 19, 2015 10:37 PM2015-05-19T22:37:27+5:302015-05-21T00:11:00+5:30

शिवकालीन वारसा : शासनाच्या उदासीन धोरणामुळे अखेरच्या घटका

On the way to destroy the Hanumantgaon | हनुमंतगड नष्ट होण्याच्या मार्गावर

हनुमंतगड नष्ट होण्याच्या मार्गावर

Next

नीलेश मोरजकर- बांदा -शिवकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील कित्येक वास्तू आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे अखेरच्या घटका मोजत आहेत. बांदा-तळकट राज्यमार्गापासून नजीकच असलेला फुकेरी गावातील शिवकालीन हनुमंतगड दुर्लक्षामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गावातील हा इतिहासकालीन ठेवा पुढील पिढीलाही समजावा, यासाठी गावकरी झटत आहेत. या गडाच्या स्मृती काही अवशेषांच्या माध्यमातून गडावर, गावात आजही सुस्थितीत आहेत. मात्र, गडाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पुरातत्व खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या फुकेरी गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. सह्याद्रीच्या कुशीत सुमारे ५०० लोकवस्तीचा हा गाव वसलेला आहे. शिवकालीन हनुमंत गडामुळे या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. समुद्रसपाटीपासून ६५० मीटर उंचीवर या गडाची बांधणी करण्यात आली आहे. गड उंचावर असल्याने येथील वातावरण हवेशीर व आल्हाददायक असते. डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत येथील वातावरणात गारवा असतो.
या गडावर हनुमंताचे पाषाण होते. यावरुनच त्याला ‘हनुमंतगड’ असे नाव पडले. कालांतराने हे पाषाण गावातील मंदिरात स्थानापन्न करण्यात आले. शिवकालीन असलेला या गडाचा इतिहास पुढील पिढीला समजावा, यासाठी इतिहासकालीन ठेवा जतन करणे गरजेचे आहे. यासाठी फुकेरीवासीयांनी पुढाकार घेण्याचे निश्चित केले आहे. शासनाला जाग आणण्यासाठी लवकरच गडाच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
हनुमंत गडाविषयी
समुद्रसपाटीपासून ६५० मीटर उंचीवर सुमारे २००० फूट उंचीवर सह्याद्रीच्या डोंगररांगात २६ एकर एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रात या गडाची उभारणी करण्यात आली आहे. हा भाग अतिशय दुर्गम असून गडावरून सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांचा काही भाग व थेट गोव्यापर्यंतचा प्रदेश नजरेस पडतो. शत्रुला चढाई करण्यासाठी अत्यंत कठीण असलेल्या या गडाचा वापर शिवकाळात टेहळणीसाठी करण्यात येई. गडाच्या एका बाजूने कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग देखील दृष्टीस पडतो. पश्चिम घाटातून कोकण प्रदेशात संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी पारगडावरुन येथे सांडणीस्वारामार्फत संदेश पाठविण्याचे काम करण्यात येई. त्यामुळे शिवकाळात या गडाचे महत्त्व अनन्यसाधारण होते. गडाचे क्षेत्र विस्तीर्ण असल्याने शत्रुला या गडावर हल्ला करुन ताबा मिळविणे कठीण होते.
हनुमंत गडाच्या अधिपत्याखाली गडघेरा म्हणून असनिये, घारपी, झोळंबे हे तीन गाव येतात. गडाची तटबंदी पुरातन असून गडाचा मुख्य दरवाजा पश्चिमेला आहे. मात्र, सद्य:स्थितीत गडाची तटबंदी व दरवाजा पूर्णपणे ढासळला आहे.
शिवकाळात शिवाजी महाराजांनी हा गड आपल्या ताब्यात घेऊन या किल्ल्यावर ३६0 गावातील शूर सैनिकांची गडकरी म्हणून नेमणूक केली होती. पुढे मोगलांनी हा गड खालसा केल्यावर हे गडकरी वेगवेगळ्या ठिकाणी निघून गेले. त्यापैकी पेंढूरकर भोसले-सावंत, मसुरकर सावंत, कुणकेरकर सावंत ठिकार, कोलते व पोकळे असे एकूण सहा गडकरी वंशज आजतागायत या परिसरात राहतात.
श्री देव पाटेकर यांची एक तनु श्री देव नितकारी गडावर एका कमंडलुच्या स्वरुपात अस्तित्वात होती. तीची मालकी व पूजापाठ गडकरी करत. हनुमंत गडावरील नितकारी जो राज्याचा रक्षक त्याबद्दल आजही राजघराण्यात आस्था असून राजघराण्याकडून देण्यात आलेली चांदीच्या घोड्यावरील नितकारीची मूर्ती आजही गावातील मंदिरात पूजेसाठी ठेवलेली आहे. गडावरील मुख्य चाळ्याचे देवस्थान श्री देवी पिसादेवीची वार्षिक गड ओवाळणी येथील गावकरी सालाबादप्रमाणे करतात. रथसप्तमीला वार्षिक कार्यक्रम येथे होतात. गडावर या पिसादेवीचे स्थान आहे. गडावर प्राचीन गोड्या पाण्याची तळी देखिल आहे.
गडाच्या पूर्वेस चौकुळ, उत्तरेस घारपी, पश्चिमेस असनिये तर दक्षिणेस खडपडे, कुंभवडे या गावांच्या सीमा येतात. हनुमंतगड पूर्णपणे ढासळला असून केवळ गडाचे काही अवशेष शिल्लक आहेत. गडावर २ तोफा असून गडाच्या पायथ्याशी गावात २ लोखंडी तोफा आहेत. गडावरील तत्कालीन न्यायसभेच्या जागेची दुरवस्था झाली आहे. गडावर झुडपांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गडावर जाताना झाडाझुडपातून वाट काढावी लागते. या गडाबाबत राजाराम आईर, अमित गवस, सुभाष आईर यांनी माहिती दिली.


फुकेरी येथील ऐतिहासिक हनुमंत गडाची दुरवस्था झाली असून, स्थानिकांनी याबाबत वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र प्रत्येकवेळी शासनाने दुर्लक्ष केल्याने या गडाच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. पुरातत्व खात्याकडेही पाठपुरावा करण्यात येणार आहे. या गडाचा विकास केल्यास याचा फायदा फुकेरी गावाबरोबरच परिसरालाही होणार आहे.
- राजाराम आईर, ग्रामस्थ फुकेरी

Web Title: On the way to destroy the Hanumantgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.