आम्ही आणलेला निधी कॉँग्रेस हडप करते

By admin | Published: July 10, 2016 11:55 PM2016-07-10T23:55:19+5:302016-07-10T23:55:19+5:30

विनायक राऊत : कोलगाव येथे शिवबंधन मेळावा

We grab the fund brought by the Congress | आम्ही आणलेला निधी कॉँग्रेस हडप करते

आम्ही आणलेला निधी कॉँग्रेस हडप करते

Next

सावंतवाडी : राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून सिंधुदुुर्ग जिल्ह्यासाठी कोट्यावधी रूपयांचा निधी आणला जातो. मात्र, हा निधी काँग्रेच्या ताब्यात जिल्हा परिषद असल्याने तेच हडप करतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी कामाला लागावे, असे आवाहन शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी केले. कोलगाव येथे शिवबंधन पंधरावड्यानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, प्रकाश परब, एकनाथ नारोजी, कोलगाव सरपंच रश्मी काजरेकर, मायकल डिसोझा, कोलगाव उपसरपंच फ्रान्सिस डिसोझा, बाळू माळकर, देवेंद्र टेमकर, शब्बीर मणियार, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आदी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, राज्यशासनाच्या माध्यमातून कोट्यावधीचा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आला आहे. ग्रामविकास विभागाचे मंत्रीपद दीपक केसरकर यांच्याकडे असल्याने सर्व विकासकामे केली. मात्र याचे श्रेय काँग्रेसची मंडळी घेऊ पाहत आहेत. त्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे जिल्हा परिषद आहे. ही जिल्हा परिषदेची सत्ता शिवसेनेकडे खेचून आणली पाहिजे. तरच पुढील काळात विकास निधी आपल्या माध्यमातून खर्च होणार आहे. अन्यथा आम्ही आणलेला निधी काँग्रेस हडप करेल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, रस्त्यावरच्या नेत्याने वा पदाधिकाऱ्याने टीका केली तर त्याला उत्तर देणे मी माझी बांधिलकी समजत नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मला पक्षासाठी काम कर, असे कधीही सांगितले नाही. तरीही त्यांनी दिलेले पद हे सामान्य जनतेसाठी वापरून विकास करीत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विकास प्रक्रियेत कुठेही मागे राहता नये, याची खबरदारी घेत आहे, असे सांगत सुखी व समृध्द सिंधुदुर्ग मला घडवायचा असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपला विजय हा नक्की आहे. एकाला पराभूत केले, आता आपल्याला बाकीच्यांना पराभूत करायचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे, असे मतही आमदार नाईक यांनी माडले.
जान्हवी सावंत यांनी शिवसेना औषधालाही शिल्लक राहणार नाही, असे इशारे देणाऱ्या राज्यकर्त्यांना आजचा मेळावा ही चपराक आहे. शिवसेना हा जनतेच्या मनात रू जलेला पक्ष आहे. जनता शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहते, याचा विश्वास असल्यानेच जनता शिवसेनेसोबत आहे. आई जिल्हा परिषद सदस्या, मुलगा पंचायत समिती सदस्य अशा प्रकारे ज्या राणेंनी घराणेशाहीचा आरोप करत शिवसेना सोडली. त्यांच्याच पक्षात घराणेशाही असल्याचा टोला सावंत यांनी लगावला.
यावेळी कोलगाव सरपंच रश्मी काजरेकर, फ्रान्सिस डिसोझा आदींनी आपले विचार मांडले. (प्रतिनिधी)

Web Title: We grab the fund brought by the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.