जनतेकडून खूप काही शिकलो

By admin | Published: June 26, 2015 10:11 PM2015-06-26T22:11:13+5:302015-06-27T00:21:47+5:30

ई. रविंद्रन : पत्रकार संघातर्फे सत्कार समारंभ

We learned a lot from the people | जनतेकडून खूप काही शिकलो

जनतेकडून खूप काही शिकलो

Next

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात येऊन खूप काही शिकता आले. निसर्गाबरोबरच माणसांचाही लळा लागला. सिंधुदुर्ग सोडून जाताना एक वेगळा अनुभव व अनुभूती घेऊन जात आहे, असे भावनिक उद्गार सिंधुदुर्गचे मावळते जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी काढले.जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांची नवी मुंबई येथे राजीव गांधी जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. मुख्यालयातील सर्व पत्रकार यांच्या भेटीस गेले होते तेव्हा ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांचा मुख्यालय पत्रकारांच्यावतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर आपले मनोगत त्यांनी मांडले. ते म्हणाले, सिंधुदुर्गात तीन वर्षांचा कालावधी कसा गेला हे समजले नाही. एक वर्ष जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद व दोन वर्षे जिल्हाधिकारी पद भूषविताना येथील जनतेच्या विविध समस्या जवळून आकलन करता आल्या.
जास्तीत जास्त समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे भूसंपादन पूर्ण केले. माझ्या कार्यकालात झालेल्या निवडणुका शांततेत पार पडल्या व जवळजवळ १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनातर्फे मोठ्या दिमाखात पर्यटन महोत्सवही साजरा करता आला.
सिंधुदुर्गात काम करताना येथील निसर्गाचा जनतेवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो. येथील माणसेही निसर्गासारखीच शुद्ध व निर्मळ आहेत. कायद्याच्या चौकटीत बसून काम करण्याकडे इथल्या जनतेचा कल असतो. त्यामुळे काम करताना कुणी वेगळ्या कामाची भीड घातलेली आठवतच नाही. कधीही अडचणीचे प्रसंग आले तरी येथील कर्मचारी, अधिकारी यांनी सर्वतोपरी मदतीचा हात नेहमीच पुढे केला.
नोकरीचा कालावधी ३० ते ३५ वर्षांचा धरला तर सिंधुदुर्गात काढलेली तीन वर्षे आपण कधीच विसरू शकत नाही, असे सांगून ते म्हणाले की, शासनाने दिलेली सर्व कामे नियोजनानुसार पार पडली. मात्र, सिंधुदुर्गसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या सी-वर्ल्ड प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण करता आले नाही, ही खंत आहे.
सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणात बऱ्याच सुधारणा करता आल्या. त्यातील काही प्रस्तावित आहेत. भविष्यात त्या पूर्ण होतील व सिंधुदुर्गनगरी मुख्यालयाचे ठिकाण वेगळ्या दिमाखात वाटचाल करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील नागरिक, आपले सहकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
(प्रतिनिधी)

Web Title: We learned a lot from the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.